वसई : वसईतील प्रसिध्द कार्डिनल ग्रेशस रुग्णालयातील डॉक्टर अंजुम शेख यांना सहकारी महिला डॉक्टरला लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी वसई पोलिसांनी शेख यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

पीडित महिला डॉक्टरने २०२३ ते २०२५ या कालावधीत रुग्णालयात अंजुम शेख यांनी अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला आहे. शेख यांनी सीसीटीव्ही बंद करून अश्लील शेरेबाजी केली तसेच शारीरिक शोषणाचे प्रयत्न केले, असा आरोप तक्रारीत केला आहे. १ फेब्रुवारी रोजी तक्रारदार डॉक्टरने रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार केली होती, त्यानंतर रुग्णालयाने दोन वेळा विशाखा समितीची बैठक आयोजित केली.

तक्रारीवर पुढील कारवाई करण्यासाठी रुग्णालयाच्या विशाखा समितीने चौकशी सुरू केली आहे. तसेच, पीडित डॉक्टरने शेख यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्यानंतर वसई पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ७४(१) (२) (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि शेख यांना अटक केली.

रुग्णालयाच्या महाव्यवस्थापिका फ्लोरी डिमेंटे यांनी सांगितले की, रुग्णालयाने तात्काळ कारवाई केली असून, विशाखा समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.