वसईत महामार्ग पूरग्रस्त होण्याचा इशारा; महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा संयुक्त दौरा

वसई:दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर यंदाही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या नाल्यांची तातडीने सफाई करून पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश वसई-विरार महापालिकेने संबंधित प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वसई (पूर्व) येथून जाणाऱ्या या महामार्गावर दररोज हजारोंच्या संख्येने वाहतूक होते. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून नैसर्गिक नाल्यांचे मार्ग बंद झाल्याने पावसाचे पाणी साचून महामार्ग जलमय होतो. यामुळे वाहतूक ठप्प होते आणि प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो.
महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुहास चिटणीस, प्रांताधिकारी शेखर घाडगे, अभियंते दिप पाचंगे, का. साटम, संजय कुकर्णी, उपायुक्त समीर भुमकर, दीपक झिंझाड, दीपक सावंत, तसेच पोलीस अधिकारी यांनी बुधवारी वर्सोवा पूल ते विरार फाटा दरम्यान पाहणी दौरा केला. या दरम्यान नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ साचलेला असल्याचे निदर्शनास आले.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले की, “पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नाल्यांची व कर्टची साफसफाई पूर्ण करण्यात यावी, यासाठी सर्व संबंधित विभागांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.”
रात्रीच्या वेळी राडारोडा टाकण्याचे प्रकार सुरुच
महामार्गालगतच्या परिसरात रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने राडारोडा व कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याचेही पाहणी दरम्यान समोर आले. वर्सोवा पूल, ससूनवघर, माजीपाडा, चिंचोटी, नायगाव, सातीवली फाटा, पेल्हार, विरार या भागांत अशा प्रकारे कचरा टाकला जात आहे.
कारखान्यांचा टाकाऊ कचरा, तसेच मटण दुकाने व चिकन विक्रेत्यांचा जैविक कचरा महामार्गालगत टाकला जात असल्याने ही ठिकाणे कचराभूमीत रूपांतरित होत आहेत, ज्यामुळे पुरस्थितीची शक्यता अधिक वाढत आहे. नागरिकांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महामार्ग प्राधिकरणाकडून कारवाईची तयारी
महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय निर्देशक सुहास चिटणीस यांनी सांगितले की, “सध्या १० ते १२ ठिकाणी नाल्यात गाळ साचलेला असून पुढील आठवड्यापासूनच ही कामे हाती घेतली जातील. पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण केली जातील.”
यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावर पाणी साचू नये यासाठी महापालिका, महामार्ग प्राधिकरण, आणि पोलिस विभाग संयुक्तपणे उपाययोजना करत असून, संबंधित विभागांकडून तात्काळ कारवाई होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?






