मुंबई - स्‍वामी विवेकानंद (एस.व्‍ही.) मार्ग रूंदीकरणात अडथळा ठरणारी गोरेगाव पश्चिम येथील १४ बांधकामांवर आज निष्कासनाची कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्‍या पुनर्वसन धोरणानुसार, बाधितांना आर्थिक मोबदला प्रदान करण्यात आला असून या निष्‍कासन कार्यवाहीमुळे स्‍वामी विवेकानंद मार्ग रूंदीकरण मोहीमेला अधिक गती मिळणार आहे. 

पी दक्षिण विभागात गोरेगाव पश्चिम येथे स्‍वामी विवेकानंद मार्गाचे रूंदीकरण प्रस्‍तावित आहे. मात्र, या ठिकाणी सन १९६० पूर्वीपासून बांधकामे अस्तित्‍वात आहेत.  मात्र, अरूंद रस्‍त्‍यामुळे या मार्गावर सकाळ आणि सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत असे. महानगरपालिकेच्या रस्‍ता रूंदीकरण धोरणांतर्गत पी दक्षिण विभागाने या १४ बांधकामांना यापूर्वीच निष्कासनाची नोटीस बजावली होती. आज पालिकेकडून  ही १४ बांधकामे हटवत सुमारे ५०० मीटरचा रस्‍ता वाहतुकीसाठी मोकळा केला. 
 
सहआयुक्‍त (परिमंडळ ४) श्री. विश्‍वास शंकरवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्‍त श्री. संजय जाधव यांच्‍या नेतृत्‍वाखाली ही निष्‍कासन कारवाई करण्‍यात आली. या रस्ता रूंदीकरण कार्यवाहीमुळे गोरेगाव पश्चिम येथील स्‍वामी विवेकानंद मार्गावरील वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे