मुंबईत HMPV चा एकही रुग्ण नाही; नागरिकांना काळजी घेण्याचे पालिकेकडून आवाहन

मुंबईत HMPV चा एकही रुग्ण नाही; नागरिकांना काळजी घेण्याचे पालिकेकडून आवाहन

मुंबई - चीनमध्ये सध्या मानवी ‘मेटान्यूमोव्हायरस’ (HMPV) या विषाणूच्या साथीचा उद्रेक सुरू असून संसर्गाची भारतात दोन प्रकरणं आढळली आहेत. कर्नाटकात याचे दोन रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं सोशल मीडयावर दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

मुंबई शहर व उपनगरात असा (HMPV) बाधित कोणताही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. तसेच आरोग्य सेवा महासंचालनालय (डी. जी. एच. एस.) आणि संचालक, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एन. सी. डी. सी. दिल्ली) यांच्याकडून ३ जानेवारी  रोजी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

काय आहे HMPV विषाणू ? 
मानवी मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एच. एम. पी. व्ही.) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे, जो सामान्यतः आर. एस. व्ही. आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस् मध्ये वर्ष २००१ मध्ये आढळला होता. 

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून  राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले असून  वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, खबरदरीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनांच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये यासंदर्भातील सूचनाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

महानगरपालिकेने जारी केल्या मार्गदर्शक सूचना : 

हे करा-
● जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे.
● साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत.
● ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे.
● भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे.
● संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुवीजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी.

हे करू नये-
● हस्तांदोलन.
● टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर.
● आजारी लोकांशी जवळचा संपर्क
● डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
● सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.  
● डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow