भाईंदरमध्ये सुकी मासळी गायब! बोंबीलप्रेमींचा हिरमोड, मच्छीमार आर्थिक संकटात

What's Your Reaction?







भाईंदर (पश्चिम) : यंदाचा पावसाळा भाईंदरमधील मच्छीमार आणि मासळीप्रेमी दोघांसाठीही निराशाजनक ठरला आहे. दरवर्षी mansoon मध्ये बाजारपेठा गाजवणारी आणि खवय्यांचे विशेष आकर्षण ठरणारी सुकी बोंबील (बोंबी बों) यंदा बाजारातूनच गायब झाली आहे. परिणामी मासळीप्रेमी नाराज झाले असून, मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
पारंपरिकरित्या मासळी हंगामात ओल्या बोंबीलचे सुकीकरण करून पावसाळ्यात विक्री केली जाते. परंतु यंदा ओल्या बोंबीलला मिळालेली अनपेक्षित मोठी मागणी आणि त्याचे वाढलेले दर (२ हजारांवरून थेट ५ हजार रुपये किलोपर्यंत) यामुळे मच्छीमारांनी अधिक ओली विक्री केली. परिणामी सुकी करण्यासाठी मासळीच शिल्लक राहिली नाही.
तसेच, हवामानातील अनिश्चिततेमुळेही नुकसान झाले. मे महिन्यात अवेळी आलेल्या पावसामुळे परातीवर वाळत घातलेली मासळी भिजून खराब झाली. आधीच कमी प्रमाणात साठवलेली सुकी बोंबीलही वापरण्यायोग्य राहिली नाही. याचा थेट परिणाम म्हणजे यंदा बाजारात सुकी बोंबील जवळपास दिसेनाशी झाली आहे.
भाईंदर पश्चिमेकडील समुकिनावर काम करणारे स्थानिक मच्छीमार सांगतात, “प्रत्येक वर्षी आम्ही थोडी मासळी बाजूला काढून घरी साठवतो. पण यंदा संधीच मिळाली नाही. ग्राहक विचारतात, पण आमच्याकडेच नाही.”
हे केवळ ग्राहकांसाठी निराशाजनक नसून, मच्छीमारांसाठी गंभीर आर्थिक संकटही ठरले आहे. छोट्या बोटींवर किंवा पारंपरिक साधनांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची उपजीविका मुख्यतः सुकी मासळीवर अवलंबून असते. हंगामात सुकवलेली मासळी विकून त्यांना दरमहा १० ते १२ हजार रुपये उत्पन्न मिळत असे. मात्र यंदा साठा न झाल्यामुळे अनेक जणांना जीवनावश्यक खर्च भागविणे कठीण झाले आहे.
सध्याच्या घडीला ना बाजारात सुकी बोंबील उपलब्ध आहे, ना मच्छीमारांकडे साठा. त्यामुळे प्रशासन आणि मत्स्यव्यवसाय विभागाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे.