20 नोव्हेंबरला मुंबईत सार्वजनिक सुट्टी, कामावर बोलावल्यास कंपन्यांवर कारवाई होणार

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत्या २० नोव्हेंबरला राज्यभरात एका टप्प्यात होत आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येकाला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी २० नोव्हेंबरला मुंबईत सार्वजनिक सुट्टी असणार आहे. तरीही कंपन्यांनी जबरदस्तीने कामावर बोलावल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी सुटी देणे बंधनकारक असणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी निर्देश जारी केले आहेत.
भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या सूचनांनुसार मुंबई शहर व उपनगरांत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांतील मतदारांना निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विविध नियम जारी करण्यात आले आहेत. २० नोव्हेंबरला होत असेलल्या विधानसभा मतदानासाठी मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबत भूषण गगराणी यांनी आदेश दिले आहेत. यामुळे मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येकालाच मतदान करणं शक्य होणार आहे.
What's Your Reaction?






