नव्याने खरेदी करण्यात आलेल्या इलेक्ट्रीक बस च्या बॅटरी चोरीला, संपूर्ण पालिका चोरांना पकडण्यासाठी धावली

विरार : वसई-विरार महापालिका मुख्यालय परिसरात उभ्या करून ठेवण्यात आलेल्या व नव्यानेच खरेदी करण्यात आलेल्या वाहनांच्या बॅटरी आज ( २६ सप्टेंबर) दुपारी दिवसाढवळ्या चोरांनी लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरांचा हा प्रयत्न निदर्शनास पडल्यानंतर पालिका कर्मचारी व अधिकारी चोरांना पकडण्यासाठी धाव घेतली. पण त्याआधीच गवतात बॅटरी टाकून पळ काढला. मात्र एकाला चोराला पकडण्यात पालिकेला यश आले आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमातून वसई-विरार महापालिकेच्या ताफ्यात नुकत्याच या बस आलेल्या आहेत. याशिवाय घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी कोट्यवधी रुपयांचे वॉटर स्प्रिंकलर्सही पालिकेने घेतलेले आहेत.
केंद्र शासनाच्या ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमां`तर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या 57 इलेक्ट्रिक बसकरता 16 मार्च 2021 रोजीच्या ठरावाला (क्रमांक 613) प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्यानुसार 20 जुलै ते 13 ऑगस्ट 2021 या कालावधीत ई-निविदा मागवण्यात आली होती.
या निविदा प्रक्रियेत हैदराबाद येथील ओलेक्ट्रा ग्रीनटेक इंडिया प्रा. लि. कंपनीला प्राधान्य मिळाले होते. त्यामुळे या कंपनीकडून पहिल्या टप्प्यात 40 बस खरेदी करण्यात येणार आहेत. पैकी 20 बस 10 ऑगस्टपर्यंत आणून त्यांची नोंदणी पूर्ण करून स्वातंत्र्यदिनी त्यांचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. तर उर्वरित या महिन्यात येणे अपेक्षित आहेत.
या बस जीपीएस यंत्रणेने सज्ज आहेत. याशिवाय बॅक व फ्रंट कॅमेरा, डिजिटल नेमिंग, स्थानक अपडेटेशनकरता स्पिकर इत्यादी सुविधा या बसमध्ये आहेत.या बस इलेक्ट्रिक असल्याने नव्याने झालेल्या पालिका मुख्यालय परिसरातच यासाठीचे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे पालिका परिवहन विभागाच्या विचाराधिन आहे. सध्या या बस पालिकेने मुख्यालय परिसरात उभ्या केलेल्या आहेत. मात्र मुख्यालय कार्यालयाला तारांचे कुंपण नाही; त्यामुळे चोर या भिंतीवरून या ठिकाणी प्रवेश करून या वाहनांतील महत्त्वाच्या वस्तू चोरून नेत आहेत.
आतापर्यंत पाच वाहनांतील बॅटरी चोरांनी लंपास केलेल्या आहेत. मात्र आजचा प्रयत्न चोरांनी भर दिवसाढवळ्या केल्याने सर्वांच्याच भुवई उंचावल्या गेल्या आहेत.
What's Your Reaction?






