ऑलम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक मॅरेथॉन इव्हेंट ॲम्बेसेडर

ऑलम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक मॅरेथॉन इव्हेंट ॲम्बेसेडर

वसई: वसई विरार महापालिकेच्या १२ व्या मॅरेथॉन स्पर्धा ८ डिसेंबरला होणार आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या स्पर्धेची मॅरेथॉन इव्हेंट ॲम्बेसेडर म्हणून ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक विजेती ठरलेल्या साक्षी मलिक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी वसई विरार महापालिकेमार्फत राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येते. यात विविध ठिकाणचे हजारो स्पर्धेक यात सहभागी होत असतात. यंदाही पालिकेच्या क्रीडा विभाग व वसई कला क्रीडा विकास मंडळ यांच्या तर्फे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा ८ डिसेंबरला होणार असून यात १६ हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. मॅरेथॉनसह बॅटल रन, धम्माल धाव, व्हील चेअर रन अशा विविध स्पर्धा पार पडणार आहेत. मॅरेथॉन इव्हेंट ॲम्बेसेडर म्हणून ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक विजेती ठरलेल्या साक्षी मलिक यांच्या नावाची घोषणा पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

मॅरेथॉनसाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. मॅरेथॉनच्या मार्गात अडथळे निर्माण होऊ नये यासाठी पालिकेतर्फे विशेष काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये मॅरेथॉन मार्गात ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्याठिकाणी डांबरीकरण करून पांढऱ्या रंगाचे पट्टे, योग्य दिशा माहिती पडावी यासाठी झाडांना रंग , दिशा दर्शक फलक , संरक्षक जाळ्या व ज्या ठिकाणाहून स्पर्धक धावणार आहेत त्याठिकाणीच्या मार्गावर काही काळासाठी वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. तर ज्या ठिकाणाहून मॅरेथॉन सुरू होणार आहे त्याठिकाणी माध्यम कक्ष, मान्यवरांसाठी व्यासपीठ, तर काम पाहण्यासाठी स्वयंमसेवक, सुरक्षारक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे.पालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत यावर लक्ष ठेवण्यात येत आहे असे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे. देशातील नामवंत खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होणार असून तेही अर्ध मॅरेथॉन व पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचे नेतृत्व करणार आहेत. आतापर्यंत या स्पर्धेसाठी १३ हजार स्पर्धकांची नोंदणी झाली असून आणखीन स्पर्धक वाढणार आहेत.

मॅरेथॉन विजेते व विविध स्पर्धेतील विजेत्यांना ५८ लाखांची पारितोषिके दिली जाणार आहेत असे आयुक्तांनी सांगितले आहे. पालिकेची आरोग्य सेवा मॅरेथॉन दरम्यान एखादी दुर्घटना घडली तर त्याचे निवारण करण्यासाठी पालिकेचे वैद्य, परिचारिका, आरोग्य सेवक असे कर्मचारी व इतर डॉक्टर असोसिएशनचे सदस्य यांची मदत घेऊन विविध आरोग्य केंद्र उभारून त्यात पथके नियुक्त केली जाणार आहेत. याशिवाय मॅरेथॉन मार्गावर सुद्धा रुग्णवाहिका व फिरते आरोग्य पथक नेमले जाणार आहे. स्पर्धकांसाठी विशेष लोकल सेवा ८ डिसेंबर रोजी वसई विरार महापालिकेची १२ वी राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पार पडणार आहे.या स्पर्धेत मुंबईसह विविध ठिकाणचे खेळाडू सहभागी होणार आहे. या स्पर्धकांची प्रवासादरम्यान होणारी गैरसोय टाळण्यासाठी या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वे मार्फत चर्चगेट ते विरार अशी विशेष लोकल सेवा दिली जाणार आहे. पहिली विशेष गाडी चर्चगेटवरून विरारसाठी पहाटे २.३० वाजता तर दुसरी लोकल पहाटे ३ वाजता सोडण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow