उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्री पद ? एकनाथ शिंदे नक्की काय म्हणाले

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर, मंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपदाच्या नियुक्तीवर सध्या पेच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा सोडला असला तरी, महत्त्वपूर्ण पदांची मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजप नेतृत्वाने शिंदेंना उपमुख्यमंत्रिपदासह इतर काही मंत्रिपदांचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. तथापि, शिंदे यांनी गृहखातं शिवसेनेला मिळालं तरच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची अट घातल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आज शिंदे यांनी दरेगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी शिंदे यांना गृहमंत्री किंवा विधानसभा अध्यक्षपदाच्या मागणीबद्दल प्रश्न विचारल्यावर, शिंदे म्हणाले, "महायुतीतील चर्चांद्वारे अनेक गोष्टींचं निराकरण होईल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदारांनी महायुतीला दिलेल्या विश्वासाचं पालन करणे आवश्यक आहे. जनतेला काय मिळणार आहे हे महत्त्वाचं आहे, त्यावर आपले लक्ष आहे. राज्याच्या विकासासाठी आम्ही कमिटेड आहोत." शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावावरून सुरू असलेल्या चर्चांविषयी देखील भाष्य केले. "मोदीजी आणि अमित शाह जे निर्णय घेतील, ते मला आणि शिवसेनेला मान्य असतील," असं शिंदे म्हणाले. गृह खात्यावर चर्चा होईल, आणि आम्ही जे आश्वासन दिले आहे ते पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्रिपदाच्या बाबतीत श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा होणं ही फक्त एक चर्चा आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं. "आम्हा तिघांची एक बैठक होईल. त्यातून महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतला जाईल," असं ते म्हणाले. शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, "विरोधकांना काही काम नाही. त्यांच्या संख्याबळात खूप घट झाली आहे. आम्हाला जनतेचं प्रेम मिळालं आहे, त्याचं आभार मानतो," असं सांगितलं. ते पुढे म्हणाले, "ईव्हीएमवर विरोधकांनी दोन्ही बाजूंनी भूमिका घेतल्या आहेत. त्यांनी एकसारखी भूमिका घेतली पाहिजे." निवडणूक आयोग फेरमत मोजणीच्या निर्णयाबद्दल योग्य तो निर्णय घेईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?






