वसई: वसई-विरार शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले असून, नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सोमवारी सकाळपासून ६६ मिमी पावसाची नोंद झाली असून, पावसाचा जोर कायम असल्याने शहरातील अनेक भागात रस्ते, सोसायट्या व बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. शनिवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी थोडी उसंत दिली होती. मात्र, सोमवारी पहाटेपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने शहरातील विवा महाविद्यालय परिसर, साईनाथ नगर, पुष्पानगर, बोळींज, ग्लोबल सिटी, नंदाखाल, दोन तलाव-वटार रस्ता, अलकापुरी, गाला नगर, गास रस्ता, संकेश्वर नगर आणि नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले आहे. वसईतील सागर शेत, गिरीज रस्ता, माणिकपूर, वसई गाव, बंगली नाका, देवतलाव तसेच नायगाव पूर्वेतील स्टार सिटी, रिलायबल, सनटेक इत्यादी परिसरांतील रस्ते आणि घरांमध्ये पाणी घुसले आहे. 

साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना व वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेषतः गैरसोय झाली. पालिकेने काही ठिकाणी सक्शन पंप बसवून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला असला तरी पावसाचा जोर आणि पाण्याचा निचरा न होणे यामुळे हे उपाय अपुरे ठरत आहेत. गृहनिर्माण संकुलांमध्येही पाण्याचा शिरकाव सलग पावसामुळे अनेक गृहनिर्माण संकुलांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. विरारच्या यशवंत पार्कमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. "मी गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून येथे राहत आहे. पाणी साचण्याची ही समस्या नित्याचीच झाली आहे, पण पालिकेकडून कोणतीही उपाययोजना होत नाही," असे येथील रहिवासी योगेश खैरे यांनी सांगितले. तर युनिटेक गृहसंकुलात पाणी शिरल्यामुळे घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचे गणेशराव बहुरूपी यांनी सांगितले. "शेवटच्या मार्गाने आम्ही टेरेसवर जाऊन राहतो आहोत," असेही त्यांनी नमूद केले. वसई तालुक्यातील पावसाची नोंद (मि. मि.) मंडळ पावसाचे प्रमाण आगाशी 39.00 निर्मळ 40.00 माणिकपूर 74.00 वसई 67.00 विरार 65.00 कामन 69.00 बोळींज 33.00 मांडवी 106.00 पेल्हार 106.00 एकूण 599.00 सरासरी 66.55 वसई-विरार महापालिकेकडून योग्य उपाययोजना न झाल्यास पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.