वसई, २६ मे: मिरा रोड ते वैतरणा या सात उपनगरीय रेल्वे स्थानकांदरम्यान मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गेल्या पाच महिन्यांत तब्बल १८० मोबाईल चोरीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या स्थानकांवर वाढत्या प्रवासी संख्येचा गैरफायदा घेत भुरटे चोर सक्रिय झाले आहेत.
वसई रेल्वे पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांकडून मोबाईल आणि अन्य मौल्यवान वस्तू चोरल्या जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. चोरीच्या घटनांमध्ये विशेषतः गर्दीच्या वेळात — म्हणजे सकाळच्या आणि सायंकाळच्या प्रवासात — वाढ झाली आहे.
गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून गस्ती, अनपेक्षित तपासण्या आणि जनजागृती मोहिमा राबविण्यात येत आहेत. याशिवाय, सीसीटीव्ही कॅमेरे हे 'तिसऱ्या डोळ्या'प्रमाणे काम करत असून, त्याद्वारे अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे.
रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना आवाहन केले आहे की, ते प्रवासादरम्यान आपली मौल्यवान साधने जपून ठेवावीत व कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
मुंबई उपनगरातील वाढती लोकसंख्या आणि प्रवासासाठी रेल्वेवर असलेले प्रचंड अवलंबन लक्षात घेता, रेल्वे सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे.
Previous
Article