वसईत यावर्षीही अनेक स्थलांतरित पक्षांचे आगमन; काही पक्षी पहिल्यांदाच वसई मुक्कामी

वसई : वसईमधील भुईगाव, गोगटे मिठागर, अर्नाळा समुद्रकिनारा , तुंगारेश्वर अभयारण्य या ठिकाणी सध्या अनेक स्थलांतरित पक्षी दिसून आले आहेत. यात वसई, पालघर येथे काळ्या पोटाचा सुरय हा पक्षी पहिल्यांदाच आढळून आला आहे. तसेच नागालँड येथून येणारे अमूर ससाणे तसेच फ्लेमिंगोदेखील आढळून येत आहेत. मात्र या भागांतदेखील बांधकामाचे प्रमाण वाढू लागल्याने या अधिवासांनादेखील भविष्यात धोका उद्भवू शकतो. त्यामुळे या पक्ष्यांचे संवर्धन करण्याची गरज पक्षी निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.
वसई, पालघर येथे यंदाच्या हंगामात सुमारे 128 विविध प्रजातींच्या जमातीची नोंद झाली आहे. सध्यस्थितीत वसई, पालघर या ठिकाणी स्थलांतरित पक्षी दिसून येत असले तरी या ठिकाणांचे संवर्धन न झाल्यास त्यांची संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही पक्षी निरीक्षक व्यक्त करत आहेत.
वाढते प्रदूषण आणि पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या आसपास होणारे बांधकाम यामुळे स्थलांतरित पक्ष्यांची संख्या यंदाही कमीच आढळून आलेली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘पक्षी सप्ताहा`च्या कालावधीत अनेक पक्षी निरीक्षक निरीक्षणासाठी आणि छायाचित्र काढण्यासाठी आवर्जून येत असतात. मात्र यंदा युरोप तसेच देशाच्या उत्तर भागातून स्थलांतर करून येणाऱ्या अनेक पक्ष्यांची अद्याप नोंद झालेली नाही. वसईत काही मोजक्या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांची काही अंशी चांगली नोंद झाली असून काही पक्ष्यांनी पहिल्यांदाच वसईत मुक्काम केल्याची नोंद पक्षी निरीक्षकांडून करण्यात आली आहे.
तलवार बदक, थापट्या, चक्रांग, काष्ठ तुतवार, मोठ्या ठिपक्यांचा गरुड, भुवई बदक, छोटा पाणलावा, लाल डोक्याचा रेडवी, करड्या मानेचा रेडवी, पांढुरक्या भोवत्या, कंठेरी चिखल्या यांसारखे पक्षी युरोपातून स्थलांतर करून येतात. मात्र या वर्षी ब्लू टेल बी इटर, थापट्या, काही प्रमाणात तलवार बदक, मार्श हॅरियर इत्यादी मोजकेच पक्षी डोंबिवलीजवळील भोपर, सातपूल, उंबारली या सारख्या शिल्लक असलेल्या पक्ष्यांच्या अधिवासात आढळून आले आहेत. तर बहुतांश पक्षी निरीक्षक पांढरा करकोचा, रणगोजा तसेच काळा बलाक यांसारख्या पक्ष्यांचे छायाचित्र काढण्यासाठी येत असतात. मात्र यंदाही या पक्ष्यांची डोंबिवलीत हजेरी लावलेली नाही. अशाच पद्धतीने प्रदूषण आणि बांधकाम सुरू राहिले तर डोंबिवलीतील स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण अगदी नाहीच्या बरोबरीला येण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्या तुलनेत वसईत स्थलांतरित पक्ष्यांची संख्या आशादायक आहे, असे मत पक्षी निरीक्षकांनी नोंदवले आहे
What's Your Reaction?






