कौटुंबिक वादातून पित्याकडून मुलावर चाकू हल्ला

विरार : कौटुंबिक वादातून पित्याने स्वतःच्या मुलावरच चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरार पश्चिम येथील गोकुळ टाउनशिपमधील गोकुळ गार्डन सोसायटीत ही घटना घडली आहे. या सोसायटीत जोशी कुटुंब वास्तव्यास आहे.
सदर घटनेत, मालाड मधील घर विक्रीतून आलेल्या ४ लाख रुपये वडिलांनी खर्च केल्यामुळे मुलगा जन्मेष जोशी याने वडील परीक्षित जोशी यांना विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वादावादी आणि हाणामारी झाली. रागाच्या भरात पित्याने चाकू घेऊन मुलाच्या छातीत वार केला. यात जन्मेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती जन्मेष यांचा भाऊ मित जोशी याने बोळींज पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. नालासोपारा विभागीय पोलीस आयुक्त विजय लगोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परीक्षित जोशी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १०९ अंतर्गत गंभीर दुखापत करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
What's Your Reaction?






