मिरा भाईंदर: मिरा भाईंदर महापालिकेच्या ताब्यातील सर्व शासकीय मालमत्तांचे जिओ टॅगिंग करून त्यांचे डिजिटलायझेशन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेच्या प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मालमत्तांबाबतची अचूक व तात्काळ माहिती शासकीय अधिकाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार असून, कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला चालना मिळणार आहे.

महापालिकेच्या विविध विभागांकडे असलेल्या मालमत्तांचे नियोजन, देखभाल व वापराबाबत सध्या एकसंध माहिती उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे अनेक वेळा माहिती अपूर्ण राहते किंवा चुकीच्या पद्धतीने दिली जाते. हे आव्हान ओळखून महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी मालमत्तांचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.

याअंतर्गत, महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सर्व वास्तूंचे सर्वेक्षण केले जाणार असून, त्या वास्तू जिओ टॅग करून डिजिटल प्रणालीशी जोडल्या जाणार आहेत. या सर्वेक्षणासाठी लवकरच एका खासगी कंत्राटदाराची निवड करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या मालकीच्या काही इमारती भाडे तत्वावर देण्यात आल्या आहेत, ज्या महापालिकेस महसूल मिळवून देतात. तर काही वास्तूंच्या देखभाल व दुरुस्तीवर मोठा खर्च केला जातो. याशिवाय प्रस्तावित आणि वापरात नसलेल्या मालमत्तांचीही यादी मोठी आहे. या सगळ्या मालमत्तांची अचूक माहिती एका क्लिकवर मिळण्यासाठी ही डिजिटल प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

"जिओ टॅगिंगमुळे कोणती मालमत्ता कुठे आहे, तिचा वापर काय आहे, तिची स्थिती कशी आहे यासंदर्भातील सर्व माहिती अधिकाऱ्यांना ऑनलाइन मिळू शकेल. त्यामुळे कामकाज अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल," अशी माहिती आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी दिली.

या उपक्रमामुळे महापालिकेच्या मालमत्तांचे व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि डिजिटली सक्षम होणार असून, भविष्यातील शासकीय नियोजनासही याचा मोठा फायदा होणार आहे.