मिरा भाईंदर देशात स्वच्छतेत अव्वल! नाविन्यपूर्ण उपक्रमांनी दिला राष्ट्रीय सन्मान

मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेने स्वच्छतेच्या दिशेने टाकलेल्या भक्कम पावलांना राष्ट्रीय स्तरावर मोठा गौरव लाभला आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२४-२५ स्पर्धेत ३ ते १० लाख लोकसंख्या गटात मिरा भाईंदर महापालिकेने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. यासोबतच महापालिकेला ‘५ स्टार कचरामुक्त शहर’ आणि ‘वॉटर प्लस’ ही प्रतिष्ठेची मानांकनंही प्राप्त झाली आहेत.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि उपायुक्त सचिन बांगर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
नाविन्यपूर्ण उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका
स्वच्छतेच्या दिशेने मिरा भाईंदर महापालिकेने हाती घेतलेले काही महत्त्वाचे उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत:
-
देशातील पहिला स्वदेशी 'विंड्रो कंपोस्टिंग प्रकल्प' येथे यशस्वीपणे कार्यान्वित असून, दररोज १० टन सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया होते.
-
प्लाझ्मा तंत्रज्ञानाचा वापर करून दररोज ८ टन ओला व सुका कचरा प्रक्रिया केला जातो.
-
मलनि:सारण प्रकल्पाद्वारे दररोज ११० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्याचा वापर सार्वजनिक स्वच्छतेसाठी केला जातो.
याशिवाय नागरिक सहभाग वाढवण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग, दुकानदारांमध्ये जनजागृती, आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कल्याण, या क्षेत्रांतही महापालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
स्वच्छतेसाठी राबविण्यात आलेले हे नाविन्यपूर्ण उपक्रम, त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि कर्मचाऱ्यांचा समर्पित सहभाग यामुळे मिरा भाईंदर देशात इतर शहरांसाठी आदर्श ठरले आहे.
What's Your Reaction?






