वसईत ड्रग तस्करी प्रकरणी ₹३०.९ लाखांचा मुद्देमाल जप्त; ३ जण अटकेत

पालघर : वसईत अंमलीपदार्थ तस्करीविरोधात मोठी मोहीम राबवताना मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने ₹१३.९० लाख किमतीचा मेफेड्रोन (एमडी) जप्त केला असून, या कारवाईत ₹१७ लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई ११ जुलै २०२५ रोजी पहाटे ३:५५ वाजता करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे अंमलीपदार्थ विरोधी पथकाने वसईतील आगरवाल कॉम्प्लेक्स, मॅकडोनाल्डसमोर, माणिकपूर येथे संशयिताला अटक केली. त्याच्याकडून ६९.५ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आला असून त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे ₹१३,९०,००० इतकी आहे.
यासंदर्भात माणिकपूर पोलीस ठाण्यात NDPS कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क) व २२(क) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून अधिक चौकशीदरम्यान अजून दोन जणांचा समावेश उघड झाला, जे या अंमलीपदार्थांच्या पुरवठ्यात सहभागी होते.
पोलिसांनी त्वरित तपास करून नालासोपारा (पूर्व) येथून या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यापैकी एकाच्या ताब्यातून ₹१७ लाख रोख रक्कम सापडली, जी त्याच्या अंमलीपदार्थ विक्रीतून मिळाल्याचे त्याने कबूल केले. ही संपूर्ण रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. या दोघांनाही सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या या तडाखेबंद कारवाईमुळे वसई परिसरात अंमलीपदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असल्याची माहिती अंमलीपदार्थ विरोधी पथकाने दिली आहे
What's Your Reaction?






