वांद्र्यात ३२ लाखांचे कोकेन जप्त, दोघांना अटक

वांद्रे - खेरवाडी पोलिसांनी वांद्रे येथून ३२ लाख रुपये किंमतीचे ८१ ग्रॅम कोकेन जप्त केले असून दोन आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी नायजेरियन आहे. एक इसम वांद्रे येथेलअमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खेरवाडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने वांद्र्याच्या एमआयजी क्लब मैदानाजवळ असलेल्या परिसरात सापळा लावून जुनैद खान (२६) या संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत ३ ग्रॅम कोकेन आढळून आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत नायजेरीयन इसम ओलेनरोवाजू इमूओबू (४९) याने कोकेन पुरविल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी वांद्र्याच्या चिंबई कोळीवाडा येथे छापा टाकूर नायजेरियन आरोपी ओलेनरोवाजू याला अटक केली.
त्याच्याकडे केलेल्या तपासणीत ७९ ग्रॅम कोकेन आढळले. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी ८१ ग्रॅम कोकेन जप्त केले. या दोन्ही आरोपींकडून जप्त केलेल्या कोकेनची किंमत ३२ लाख ४० हजार एवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपींविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त (परिंडळ ८) मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविदास जांभळे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक वारे,सहाय्यक पोलीस निरीक्षक काते, भीसे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
What's Your Reaction?






