मुंबई, २२ जुलै: वांद्र्यात भर दुपारी एका धावत्या रिक्षात १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने रिक्षाचालकाला धारदार शस्त्र दाखवून धमकावले आणि रिक्षात घुसून मागील सीटवर बसलेल्या तरुणीचा विनयभंग केला.

सोमवारी दुपारी एसव्ही रोडवरील सायबा हॉटेलजवळ रिक्षा सिग्नलला थांबली असता, काळ्या शर्टातील इसम जबरदस्तीने रिक्षात शिरला. सिग्नल सुटताच त्याने शस्त्र दाखवून चालकाला रिक्षा थांबवू नको अशी धमकी दिली. त्यानंतर मागील सीटवर बसून असलेल्या तरुणीशी अश्लील वर्तन केले.

तरुणीने घरी जाऊन आपल्यावर झालेल्या प्रकाराबाबत कुटुंबियांना माहिती दिली. संध्याकाळी तिच्या काकांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीविरोधात IPC कलम ७४, ७८, ७९ व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.