मराठी बातमी: सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडप परवानगीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू

मराठी बातमी: सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडप परवानगीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू

मुंबई : महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाला राज्य उत्सव घोषित केल्यानंतर, मुंबई महानगरपालिकेने मंडळांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता सार्वजनिक गणेश मंडप परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाली आहे.

गलगली यांनी ४ जुलै २०२५ रोजी पालिकेचे उप आयुक्त प्रशांत सपकाळे यांना पत्र लिहून ऑनलाईन एक खिडकी प्रणाली सुरू करण्याची विनंती केली होती, जेणेकरून गणेश मंडळांना वेळेत परवानग्या मिळतील आणि तयारी सुरळीत होईल.

उप आयुक्त सपकाळे यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत संगणकीय प्रणाली लागू केली आहे. यामुळे मुंबई व उपनगरातील गणेश मंडळांना मंडप उभारणी, मूर्ती स्थापना, सजावट यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या आता एकाच ऑनलाइन व्यासपीठावरून मिळू शकतील.

अनिल गलगली यांनी सांगितले की, “मुंबईत हजारो मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. परंतु परवानगी प्रक्रियेमुळे दरवर्षी अडचणी निर्माण होतात. ही ऑनलाईन प्रणाली प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करेल.”

शासन व महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक नियोजित, सुरक्षित व सुरळीत पार पडेल, असा विश्वास मंडळांनी व नागरिकांनी व्यक्त केला आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow