चित्रबलाकचे वसईत आगमन; पक्षीप्रेमींना अनोखा आनंद

चित्रबलाकचे वसईत आगमन; पक्षीप्रेमींना अनोखा आनंद

वसई, ता. २३ जुलै – वसईच्या निसर्गरम्य पाणथळ परिसरात बहुप्रतीक्षित चित्रबलाक (Painted Stork) या देखण्या स्थलांतरित पक्ष्याचे आगमन झाले असून, यामुळे पक्षीप्रेमी व अभ्यासकांमध्ये प्रचंड आनंदाची लाट उसळली आहे. सध्या वसई-उमेळा फाटा आणि दत्तानी मॉल परिसरातील हिरव्यागार व विस्तीर्ण पाणथळ जागांमध्ये या पक्ष्यांचे थवे मोठ्या प्रमाणात विसावलेले दिसून येत आहेत.

नायगाव येथील रहिवासी आणि पक्षी निरीक्षक चेतन घरत यांनी या आगंतुकाचे अत्यंत मोहक असे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. चित्रबलाक हे पक्षी त्यांच्या पांढऱ्या-पिवळ्या-गुलाबी रंगसंगतीमुळे सहज लक्ष वेधून घेतात. पिवळी चोच, गुलाबी पंख आणि लालसर पाय असलेला हा पक्षी भारतीय उपखंड व आग्नेय आशियात मोठ्या प्रमाणात आढळतो. विशेषतः नद्या, तलाव आणि भातशेतीसारख्या पाणथळ भागांमध्ये ते आश्रय घेतात.

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यापासून तुंगारेश्वरच्या सदाहरित जंगलापर्यंतचा परिसर विविध प्रकारच्या परिसंस्थांनी समृद्ध आहे. किनारपट्टी, खाड्या, गोड्या पाण्याच्या पाणथळ जागा, वने – यामुळे विविध निवासी व स्थलांतरित पक्ष्यांना येथे आकर्षण वाटते. सँडपाइपर, प्लोव्हर, ऑयस्टरकॅचर, बगळे, जकाना अशा अनेक पक्ष्यांच्या प्रजाती वर्षभर या परिसरात पाहायला मिळतात.

या पक्ष्यांचे वावरणे वसईतील पाणथळ परिसंस्थांच्या आरोग्याचे लक्षण मानले जात असले तरी, मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण व शहरीकरणामुळे या परिसरांचे जैवविविधतेवर मोठा परिणाम झाल्याचे चेतन घरत यांनी नमूद केले. महसूल विभाग आणि महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चेतन घरत म्हणाले, “वसईतील पाणथळ जागा केवळ पक्ष्यांसाठीच नाही तर संपूर्ण परिसंस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. चित्रबलाकासारख्या पक्ष्यांचे आगमन ही सकारात्मक बाब असली, तरी ती अधिक काळ टिकवण्यासाठी या परिसंस्थांचे संरक्षण व संवर्धन अत्यावश्यक आहे.”

पक्षीप्रेमींनी, निसर्ग अभ्यासकांनी आणि स्थानिक प्रशासनाने एकत्र येऊन वसईतील निसर्गसंपत्तीचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे मत यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow