मुंबई: वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी आयुष्याचा निरोप घेणारी संध्या पाठक ही केवळ एक विद्यार्थीनी नव्हती. ती एक लेखक होती, एक स्वप्नवत मुलगी होती जिने वाचकांच्या मनात ‘द वर्ल्ड बेस्ट एक्स फ्रेंड’ या इंग्रजी कादंबरीतून आपले स्थान निर्माण केले होते. परंतु एकतर्फी प्रेम, त्यातून आलेले नैराश्य आणि त्याचा मनोमन झालेला संघर्ष इतका खोलवर गेला की अखेर गुरुवारी सकाळी संध्याने विलेपार्लेतील साठ्ये महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आयुष्याचा शेवट केला.नालासोपाऱ्याची रहिवासी असलेली संध्या साठ्ये कॉलेजच्या विज्ञान शाखेत तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होती.

आत्महत्येनंतर पोलिसांनी तिचा मोबाईल आणि बॅग ताब्यात घेतली. मोबाईलमध्ये एका तरुणाला पाठवलेले शेकडो मेसेज सापडले, ज्यातून एकतर्फी प्रेमाची भावना आणि तिचं मानसिक खच्चीकरण स्पष्ट झालं. पोलिसांनी सांगितलं की, या मेसेजमधून आत्महत्येचा हेतू एकतर्फी प्रेमातून निर्माण झाल्याची शक्यता अधिक आहे. यासोबतच तिच्या बॅगेत नैराश्यावरील औषधे सापडल्यामुळे तिच्या मानसिक आरोग्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

संध्याच्या मोबाईलमधील डाटा सखोल तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. ज्या तरुणाला तिने मेसेज केले होते, त्याचा जबाब देखील घेतला जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.संध्याच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी मात्र वेगळाच आरोप केला आहे. "तिने आत्महत्या केली नसून, कुणीतरी तिला ढकलले," असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. कारण संध्याने कुठलीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नव्हती. पोलिस तपासाच्या पारदर्शकतेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

संध्याच्या आयुष्याचा आणखी एक पैलू म्हणजे तिचं साहित्यिक योगदान. अवघ्या वयात तिने "The World's Best Ex-Friend" हे इंग्रजी पुस्तक लिहिलं होतं. प्रेम, विरह, आणि मैत्रीच्या गुंतागुंतीच्या भावना उलगडणाऱ्या या पुस्तकाला अमेझॉनवर चांगली मागणी होती. तिच्या वडिलांनी सांगितले की, लेखिका होणं हे तिचं मोठं स्वप्न होतं. ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर ती खूप आनंदात होती.

तिच्या लेखनात एक भावनिक खोलपणा होता, जो वाचकांना जोडून ठेवत असे. पण तिच्या आयुष्यातील एकतर्फी प्रेमाने तिचं हे संवेदनशील मन कमकुवत केलं.
संध्याच्या आत्महत्येमागचं वास्तव केवळ तिचं व्यक्तिगत दुःख नव्हतं, तर ते आपल्या समाजासाठी एक मोठा इशारा आहे. एकतर्फी प्रेमातून उद्भवणाऱ्या मानसिक तणावाला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. संवाद, समजूत, आणि वेळेवर मदतीचा हात दिला गेला असता तर आज संध्या जिवंत असती.

तिच्या आत्महत्येच्या निमित्ताने आपण सर्वांनी एक गोष्ट शिकली पाहिजे – स्वप्न बघणाऱ्यांना आधार द्या. प्रेमात तुटलेल्यांना दोष देऊ नका. आणि प्रत्येक भावनेच्या पाठीमागे एक जिवंत मन आहे, त्याला समजून घ्या.