एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा लवकरच ?

मुंबई - राज्यात सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला असतानाच एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांनी राजभवनात दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस उलटले आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्याने ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. तसेच अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. सध्या महायुतीच्या गोटात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असणार ?
एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता लवकरच नवे सरकार स्थापन होणार आहे असे असले तरीही अद्याप महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातच आता मुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत असे एकीकडे बोलले जाते तर दुसरीकडे भाजपचे अनेक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही आहेत. तसेच अजित पवार गटानेही मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?






