भाईंदर : गायमुख (ठाणे महापालिका हद्दीत) ते काशीमीरा (मीरा भाईंदर महापालिका हद्दीत) या दरम्यानच्या मेट्रो-10 प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) कार्यालयात मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. त्यांनी सांगितले की, मेट्रो-10 च्या कामासोबतच फाउंटन ते घोडबंदर रस्त्याचा देखील विकास आवश्यक आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांची निविदा एकाच वेळी काढण्यात यावी, जेणेकरून वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मेट्रोसह चांगली वाहतूक सुविधा उपलब्ध होईल.

या बैठकीत मीरा भाईंदरमधील ४७ रस्त्यांच्या कामांनाही गती देण्याचे निर्देश देण्यात आले. त्यापैकी ३५ रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित १२ रस्त्यांची ७० टक्के कामे पूर्ण झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बैठकीला प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त अश्विन कुमार मुदगल, विक्रम कुमार, महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक यांनी मेट्रो प्रकल्प आणि रस्ते विकास यांचे समन्वय साधून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.