आता घर नोंदणीची ऑनलाइन सुविधा, राज्यात कुठूनही करता येणार नोंदणी

मुंबई: घर नोंदणीसाठी उपनिबंधक कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जावं लागणारी कटकट आता इतिहासजमा होणार आहे. राज्य सरकारने घरांच्या नोंदणीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं आहे की, १ मे पासून 'एक राज्य एक नोंदणी' ही प्रक्रिया सुरू होणार आहे, ज्यामुळे राज्यातील कुठेही बसून घरांची नोंदणी करणे शक्य होईल.
बावनकुळे यांनी सांगितले की, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल आणि फेसलेस नोंदणी केली जाईल. तुम्ही पुण्यात बसून नागपुरातील घराची नोंदणी करू शकता, तसेच मुंबईतून पुण्यातील घराची नोंदणी करणेही शक्य होईल. यासाठी आधार कार्ड आणि आयकर दस्तऐवजांचा वापर करून नोंदणी करता येईल.
महसूल मंत्री म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्र या संकल्पनांच्या अंतर्गत ही योजना राबवली जात आहे. सुरुवातीला मुंबई आणि उपनगरांमध्ये प्रायोगिक स्वरूपात सुरू केलेली ही योजना आता संपूर्ण राज्यात लागू होणार आहे.”
या नव्या प्रक्रियेमुळे नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन ताटकळत बसण्याची गरज राहणार नाही. तसेच दलालांचे अडथळेही कमी होतील, ज्यामुळे नोंदणी प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ होईल.
या उपक्रमामुळे नागरिकांना केवळ वेळेची बचतच होणार नाही, तर त्यांना अधिक पारदर्शक आणि सोपी प्रक्रिया अनुभवता येईल.
What's Your Reaction?






