वसई-विरार महापालिका जुन्या मुख्यालयात अनैतिक धंदे; फर्निचरची सुरक्षा रामभरोसे

विरार : वसई-विरार महापालिकेचा कारभार विरार पश्चिम येथील नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर जुन्या कार्यालयात सायंकाळच्या वेळात अनैतिक धंदे चालतात; शिवाय या कार्यालयातील कोट्यवधी रुपयांचे फर्निचर चोरीला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी या कार्यालयांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही कार्यालयांचे सीसीटीव्ही फुटेजच पालिकेकडे उपलब्ध नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजचा डेटा ‘ओव्हर राईट` होत असल्याने ही माहिती उपलब्ध नाही, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘सी` मुख्य प्रवेशद्वार आणि दुसऱ्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच वसई-विरार महापालिका जुने मुख्यालय इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे पालघर जिल्हाध्यक्ष महेश कदम यांनी 25 फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल केला होता. या अर्जाला उत्तर देताना पालिकेच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे संगणक तंत्रज्ञ तथा जनमाहिती अधिकारी हर्षल पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या अर्जाच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 1 फेब्रुवारी 2025 ते 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत सीसीटीव्ही फुटेजची रेकॉर्डिंग क्षमता 12 ते 15 दिवसांचीच असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेचा कारभार 10 जुलै रोजी ऐन वेळी विरार पश्चिम येथील नवीन प्रशासकीय इमारतीत हलविण्यात आलेला होता. या अत्याधुनिक इमारतीतीकरता पालिकेने तब्बल 400 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. या इमारतीत केवळ 54 कोटी रुपयांचे अत्याधुनिक फर्निचर खरेदी केलेले आहे. विशेष म्हणजे; नवीन प्रशासकीय इमारतीच्या निर्मिती व उद्घाटनात अनेक वर्षे गेल्याने कोट्यवधी रुपयांचे हे फर्निचर धूळखात होते.
प्रत्यक्षात; महापालिकेने जुन्या इमारतीतील अनेक चिजवस्तूंचा पुनर्वापर नवीन प्रशासकीय इमारतीत करणे अपेक्षित होते. पालिकेने मात्र सोयीस्कररीत्या हा वापर टाळला आहे. परिणामी; जुन्या इमारतीत कोट्यवधी रुपयांचे फर्निचर धूळखात सोडून देण्यात आलेले आहे. पालिका सभागृहात आजघडीला कोट्यवधी रुपयांचे लाकडी फर्निचर, अनेक दालनांत वातानुकूलित यंत्रणा, टीव्ही, घड्याळे, खुर्च्या-टेबल व अन्य सामग्री आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या दालनांवर लाखो रुपये खर्च करून सोफे-गालिचा बसविण्यात आलेले होते. या वस्तू आज रामभरोसे तशाच सोडून देण्यात आलेल्या आहेत. या वस्तूंचा विनियोग पालिका कसा करणार आहे? याबाबत पालिकेकडे कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे या वस्तू चोरीला जात असल्याची कल्पना अनेक नागरिकांनी आयुक्तांना दिलेली होती. सायंकाळच्या वेळात अनेक कर्मचारीच या वस्तू लांबवत असल्याची बाबही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली होती.
दरम्यान; या इमारतींकडे दुर्लक्ष झाल्याने सायंकाळच्या वेळात या इमारतींतील काही दालनांत कर्मचारी व त्यांच्या सहकाऱ्यांचे अनैतिक धंदे चालत असल्याच्या तक्रारी आहेत. या कार्यालयातून पालिकेचा त्रोटक कारभार चालत असल्याने महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा आणि सीसीटीव्ही प्रणालीवर पालिका कोट्यवधी रुपये खर्च करत असताना माहिती-तंत्रज्ञान विभागाने दिलेले उत्तर निष्काळजीपणा-हलगर्जी बेफिकिरी दर्शवणारे असल्याने नागरिकांनी पालिकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केलेला आहे.
What's Your Reaction?






