मेट्रोच्या कामादरम्यान सुरक्षेचा अभाव; अपघाताचा धोका निर्माण

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर परिसरात सध्या सुरू असलेल्या मेट्रो उभारणीच्या कामादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी न घेण्यात आल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कामाच्या ठिकाणी साहित्याची चढ-उतार करताना मजुरांसह नागरिकांनाही गंभीर धोका निर्माण झाला असून, कोणत्याही क्षणी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एमएमआरडीएमार्फत मागील पाच वर्षांपासून दहिसर ते भाईंदर दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. यातील दहिसर ते काशीगावदरम्यानचे काम जवळपास पूर्ण झाले असून, काशीगाव ते भाईंदर पश्चिम दरम्यानचा टप्पा सध्या गतीमान आहे.
मात्र, या टप्प्यात काम सुरू असताना आवश्यक सुरक्षेची साधने, सूचना फलक, अडथळे आणि मजुरांसाठी सुरक्षा उपकरणे यांचा अभाव दिसून येत आहे. काही ठिकाणी रस्त्यावरच साहित्य उभे करून वाहतूक अडवली जात आहे. परिणामी वाहनचालक आणि पादचारी यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने तातडीने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अशा प्रकल्पांमध्ये सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. याकडे संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा संभाव्य दुर्घटनांबाबत जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
What's Your Reaction?






