मुंबई: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार करत, विरार स्थानकाच्या पायाभरणीचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)मार्फत साकारल्या जात असलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पात, विरार हे दुसरे स्थानक असणार आहे.

या स्थानकासाठी पहिल्या स्लॅबचे कास्टिंग पूर्ण झाले असून, तो तब्बल ३५.३२ मीटर रुंद आणि ५० मीटर लांब आहे. या कामासाठी एकूण १५५५ घन मीटर काँक्रीटचा वापर करण्यात येणार आहे. स्थानकाच्या उभारणीच्या दृष्टीने हा एक मोठा टप्पा मानला जातो.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण लांबी ५०८ किलोमीटर असून, त्यातील काही भाग महाराष्ट्रातून तर बहुतांश मार्ग गुजरात राज्यातून जाणार आहे. जरी महाराष्ट्रातील काम सुरुवातीला उशिराने सुरू झाले असले तरी सध्या ते वेगात प्रगतीपथावर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

याआधी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील स्थानकाच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाची उभारणी तीन पॅकेजमध्ये होत असून, तिसऱ्या पॅकेजअंतर्गत महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील शिळफाटा ते झारोली (१३५ किमी) पर्यंतचा मार्ग, तसेच ठाणे, विरार आणि बोईसर ही तीन स्थानके उभारण्यात येणार आहेत.

विरार स्थानकाच्या उभारणीत एकूण ९ स्लॅबचे काम होणार असून त्यानंतर बुलेट ट्रॅक टाकण्याची प्रक्रिया सुरू होईल. स्थानकाच्या तळमजल्यावर तिकीट कक्ष, सरकते जिने, लिफ्ट्स, विश्रांतीगृहे, प्रवासी सुविधा केंद्र, सुरक्षा तपासणी केंद्र, वैद्यकीय उपचार कक्ष आणि दुकाने असतील. पहिल्या मजल्यावर ४ बुलेट ट्रॅक असणार असून त्यांच्या दोन्ही बाजूंना प्लॅटफॉर्म असतील.

हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर तो महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमधील एक महत्त्वाचा आर्थिक दुवा (Economic Corridor) ठरणार आहे. त्यामुळे केवळ प्रवासाचा वेळच नाही तर व्यावसायिक विकासालाही गती मिळणार आहे.