भाईंदर: मेट्रो कारशेडसाठी झाडांचे चुकीचे सर्वेक्षण, महापालिकेचा फेरसर्वेक्षणाचा निर्णय

भाईंदर, २७ जून: मेट्रो कारशेडसाठी प्रस्तावित असलेल्या झाडतोडीविरोधात आता पर्यावरणप्रेमींनी दिलेल्या हरकतींमुळे महापालिकेला झाडांचे फेरसर्वेक्षण करावे लागत आहे. एमएमआरडीएच्या कंत्राटदाराने दिलेल्या झाडतोड यादीत झाडांची संख्या, वय व उंची याबाबत अपूर्ण व चुकीची माहिती आढळून आल्याने महापालिकेने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या निर्णयानुसार, झाडांचे फेरसर्वेक्षण उद्यान विभागाच्या उपायुक्त कल्पिता पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या संदर्भात आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी आवश्यक निर्देश दिले आहेत.
एमएमआरडीएने सादर केलेल्या प्रस्तावानुसार सुमारे १२,४०० झाडे तोडण्याची योजना आहे. १२ मार्च रोजी यासंदर्भात सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्यावर हजारो नागरिकांनी हरकती दाखल केल्या. ११ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत २१,००० नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांनी झाडतोडीविरोधात ठाम भूमिका मांडली.
दरम्यान, अंतिम शासकीय निर्णय होण्यापूर्वीच काही झाडे तोडण्यात आली असून, त्याविरोधात नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. काही झाडांवर सर्वेक्षण क्रमांकच दिसून आला नाही, तर काहींच्या उंची आणि वयाच्या नोंदींमध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे मूळ सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, फेरसर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत पुढील कोणतीही झाडतोडीची कारवाई होणार नाही. पर्यावरणप्रेमी आणि नागरिक या मुद्द्यावर एकत्र येत असताना, प्रशासनाच्या या निर्णयामुळे थोडासा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
What's Your Reaction?






