शौचालयांचा मैला मलनिःसारण प्रकल्पात न टाकता उत्तनच्या नाल्यात

शौचालयांचा मैला मलनिःसारण प्रकल्पात न टाकता उत्तनच्या नाल्यात

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील शौचालयांच्या खासगी टाक्यातील मैला टँकरमध्ये जमा करून मलनिःसारण प्रकल्पात न टाकता तो उत्तनच्या डम्पिंग ग्राउंड वरील खुल्या नाल्यात टाकून देत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे उत्तन गाव व परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून हा प्रकार तत्काळ थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मीरा भाईंदर महापालिकेकडून शहरातील सोसायट्या व खासगी इमारतीमधील शौचालयांच्या टाक्यांच्या सफाईची सुविधा पुरवली जाते. अत्याधुनिक वाहनांच्या मदतीने सशुल्क हे काम केले जाते. वाहनात जमा होणारा मैला हा प्रक्रियानंतर खाडीत सोडून देण्याच्या दृष्टीने शहराच्या विविध भागातील मलनिःसारण प्रकल्पात टाकला जाणे आवशक आहे. मात्र तसे न करताच मैला उत्तनच्या कचरा प्रकल्पाजवळ असणाऱ्या नाल्यात टाकून दिला जात आहे.

डम्पिंगवर साठलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधी व इतर समस्यांना तोंड देत असतानाच आता नाल्यात मैला टाकण्यास सुरुवात झाल्याने संतप्त स्थानिक नागरिकांनी आक्रमक होत शौचालयांची टाक्यांची सफाई करणारी वाहने अडवली. आणि त्यानंतर पालिका आयुक्त राधाविनोद शर्मा यांची भेट घेतली. यावेळी कचऱ्यानंतर मैल्यामुळे आरोग्य धोक्यात येणार असल्याचे सांगत, ही कार्यवाही तत्काळ थांबवण्याची तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow