मुंबई:बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून पोलिसांचा धाक दाखवून गिरगाव चौपाटीवरील परंपरागत मच्छिमार बांधवांच्या नौकांना उचलण्यात आल्याची घटना गुरुवारी दि. ०३ रोजी घडली.प्रशासनाकडून करण्यात आलेल्या अवैध कारवाईमुळे मच्छिमार समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.या कारवाईच्या विरोधात मच्छिमार आक्रमक भूमिका घेणार आहेत. याबाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मच्छिमारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ह्यांच्याकडे केली आहे.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आलेली सदर कारवाई चुकीची असून परवानाधारक नौका मालकांना कुठलीही सूचना न देता बोटी जप्त करणे ही सरळ कायद्याची पायमल्ली असल्याने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कष्टकरी मच्छिमार समाजाला आपल्याच राज्यात अश्या दुय्यम वागणुकीला सामोरे जावे लागत आहे. यास सध्याचे सरकार जबाबदार असल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांच्या कडून सांगण्यात आले आहे.