वसई-विरार महापालिकेचा 'प्लास्टिक मुक्ती' संकल्प; कापडी पिशव्यांच्या निर्मितीला प्रोत्साहन

वसई, 29 मे – वसई-विरार क्षेत्रात वाढत्या प्रमाणात प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर, वसई-विरार महापालिकेने ठोस पावले उचलली असून कापडी पिशव्यांच्या निर्मितीला जोर दिला आहे. ‘प्लास्टिकमुक्त वसई-विरार’ या संकल्पनेतून पालिकेने एक लाख कापडी पिशव्यांच्या निर्मितीचा संकल्प केला आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, सध्या ३० हजार कापडी पिशव्या महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आल्या असून उर्वरित पिशव्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी सुरुवातीला ३५ हजार मीटर कापड खरेदी करण्यात आले असून, १७ महिला बचत गटांना पिशव्या शिवण्याचे काम देण्यात आले आहे.
या पिशव्या मुख्यतः बाजारात वापरणाऱ्या विक्रेत्यांना दिल्या जातील. ग्राहकांनी त्या विक्रेत्याकडून खरेदी करताना कापडी पिशवी वापरल्यास, १० रुपये अॅडव्हान्स स्वरूपात द्यावे लागतील. नंतर, जर तोच ग्राहक प्लास्टिक ऐवजी तीच पिशवी पुन्हा वापरून खरेदीस आला, तर त्याला १० रुपये परत दिले जातील. त्यामुळे कापडी पिशव्या वापरण्याची सवय निर्माण होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी व्यक्त केला.
महापालिकेने कापडी पिशव्या सहज उपलब्ध होण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी २५ 'कापडी पिशवी वेंडिंग मशीन' बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अंदाजपत्रक मागवण्यात आले आहे, अशी माहिती उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिली.
जुलै 2022 पासून महापालिकेने एकूण 6,680 ठिकाणी तपासणी केली असून 912 ठिकाणी प्लास्टिक वापर आढळून आल्यामुळे कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण 52 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 19.61 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जप्त केलेले प्लास्टिक पुनर्नवीनीकरणासाठी पाठवले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
"शासनाच्या सूचनांनुसार प्लास्टिकविरोधी उपाययोजना करत आहोत. कारवाई, जनजागृती, आणि कापडी पिशव्या निर्मिती या तीनही पातळ्यांवर आमचे प्रयत्न सुरू आहेत," असे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?






