भाईंदर : महिलांच्या आरोग्याचे संवेदनशील भान ठेवत २०१९ साली महापालिकेने सुमारे ३ लाख ५५ हजार रुपये खर्चून सॅनिटरी नॅपकिन बनवणारी यंत्रणा खरेदी केली. या यंत्रणेमागील उद्देश होता – महिलांना मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची सोय उपलब्ध करून देणे तसेच महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे. मात्र, सहा वर्षांपासून ही मशीन न वापरता पडून राहिल्यामुळे ती अक्षरशः भंगारात गेली आहे.

महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने हा उपक्रम सुरू केला होता. तत्कालीन महिला व बालकल्याण समिती सभापती दीपिका अरोरा यांच्या शिफारसीनुसार ही मशीन खरेदी करण्यात आली होती. मात्र, खरेदी करताना कोणतीही स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबवता फक्त संस्कृती एंटरप्रायझेस या एका ठेकेदाराकडून कोटेशन घेऊनच मशीन खरेदी करण्यात आली होती.

यानंतर एका महिला स्वयंसेवी संस्थेसोबत तीन वर्षांचा करार करून उपक्रम सुरू करायचा होता. परंतु, संस्थेने प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू केले नाही. परिणामी ही यंत्रणा महापालिकेच्या कार्यालयात वापर न होता धूळखात पडून राहिली. दरम्यान, कोणतीही देखभाल न झाल्यामुळे मशीन गंजली असून तिचे सर्व भाग आणि मोटर निकामी झाले आहेत.

इतकेच नव्हे तर, नॅपकिन तयार करण्यासाठी खरेदी केलेला कच्चा माल – विशेषतः कापूस पूर्णपणे खराब झालेला आहे. ही धक्कादायक माहिती शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांद्वारे उघडकीस आली.

या प्रकरणात संबंधित स्वयंसेवी संस्थेवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहितीही पुढे आली आहे. यासंदर्भात उपायुक्त, समाज विकास अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जनसंपर्क अधिकारी राज घरत यांनी मात्र सांगितले की, "संबंधित विभागाला खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. माहिती मिळाल्यानंतर ती प्रसारित करण्यात येईल."

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारा हा उपक्रम केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा आणि जबाबदारीझालेल्या अंमलबजावणीच्या अभावामुळे अपयशी ठरल्याची टीका आता सामाजिक स्तरावर जोर धरू लागली आहे.