भाईंदर, ११ जून: भाईंदर पूर्वेतील बहादूरनगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाचा त्याच्यासोबत राहणाऱ्या मित्राने कोयत्याने गळा चिरून खून केल्याचा आरोप असून, हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत व्यक्तीचे नाव अनिस नबी (४०) असे असून, तो दोन दिवसांपूर्वीच आपल्या मित्र संजय शर्मा याच्यासोबत उत्तर प्रदेशहून भाईंदरमध्ये आला होता. ते दोघेही बहादूरनगर येथील कैलास राम यांच्या भाड्याच्या खोलीत राहत होते.
कैलास राम हे पापड विक्रीचे काम करत असून, संजय शर्मा हा रंगकाम करणारा मजूर आहे. घटनेच्या दिवशी कैलास घराबाहेर असताना खोलीत अनिस आणि संजय एकटे होते. परत आल्यानंतर कैलासला अनिस मृत अवस्थेत आढळला, तर संजय शर्मा घटनास्थळावरून गायब होता.
घटनास्थळी कोयत्याचा वापर करून अत्यंत क्रूरपणे गळा चिरण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हत्या अत्यंत निर्दयी पद्धतीने करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी पाहता, ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय आहे.”
सध्या पोलिसांनी संजय शर्माचा शोध सुरू केला आहे. अनिस आणि संजय यांच्यात नेमकं काय वाद झाले होते, हे अद्याप अस्पष्ट असून, पोलीस सर्व शक्यता तपासत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली जात आहेत.
या घटनेनंतर बहादूरनगर परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
Previous
Article