एलिफंटा बोट दुर्घटनेत नालासोपार्याच्या रामरथी देवी यांचा मृत्यू
आपल्या भाच्याच्या लग्नासाठी त्या उत्तरप्रदेश मधून नालासोपाऱ्यात आल्या होत्या. मुंबईत सहलीसाठी गेल्या असताना एलिफंटा बोट दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

वसई - भाच्याच्या लग्नासाठी नालासोपार्यात आलेल्या उत्तर प्रदेशातील रामरथी देवी (५०) या महिलेचा बुधवारी झालेल्या बोट दुर्घटनेत बुडून मृत्यू झाला आहे. लग्न सोहळा आटोपल्यानंतर त्या भाच्यासोबत मुंबईत सहलीसाठी गेल्या होत्या.
नालासोपारा पूर्वेच्या बिलालपाडा येथे राहणाऱ्या गौतम गुप्ता (३०) याचे ११ डिसेंबर रोजी लग्न होते. या लग्नासाठी उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथे राहणारी त्याची मावशी रामरथी देवी (५०) या आल्या होत्या. लग्न आटोपल्यानंतर त्या इतर नातेवाईकांसोबत २२ तारखेला गावी परतणार होती. तो पर्यत मावशीला मुंबई फिरवून आणण्याचा विचार गौतमने केला. एफिलफंटा बघण्यासाठी बुधवारी दुपारी तो मावशी आणि बहिणीला घेऊन चर्चगेटला गेला. बोटीत बसल्यावर सर्व काही सुरळीत सुरू होतं. दुपारी साधारण पावणेचारच्या सुमारास बोट दुर्घटना घडली. बोट बुडू लागताच बोटीमध्ये एकच गोंधळ उडाला होता. लोकं जीव वाचविण्यासाठी हातात जी वस्तू मिळेल त्याचा आधार घेत होते, असे गौतमने सांगितले. आम्ही १५ मिनिटात पाण्यात होतो मी लाईफ जॅकेट दिले आणि अनेकांना पाण्याबाहेर काढून वाचवल्याचे गौतमने सांगितले. माझी बहिण आणि मावशी बुडत असताना मी दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र मी केवळ माझ्या बहिणीला वाचवू शकलो. मावशीला मला वाचवता आलं नाही, अशी खंत त्याने व्यक्त केली.
मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली होती. ज्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. नौदलाच्या स्पीडबोटीने प्रवाशी बोटीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली होती.
What's Your Reaction?






