एसटीच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय

पुणे:महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळातील (एमएसआरटीसी) कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तास अन् तास बसची वाट पाहात थांबलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी नियमितच्या वेळेपेक्षा जास्त वेळ खर्ची पडला.बंदचा परिमाण पुणे विभागात देखील पाहायला मिळाला. विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी) आणि पुणे स्टेशन या बसस्थानकातून नियमितपणे सुटणाऱ्या गाड्यांपैकी निम्म्यापेक्षा कमी गाड्या रस्त्यावर धावत होत्या.
एसटी कामगारांच्या विविध मागण्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी सातत्याने आंदोलन करूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संपाचे हत्यार उपासले आहे. कर्मचारी संघटनांनी एकत्र येत मंगळवारपासून पुणे विभागातील सर्वच एसटी स्थानकात धरणे आंदोलन सुरु केले आहे.शिवाजीनगर आगाराला एसटी संपाचा मोठा फटका बसला. शिवाजीनगर आगारातून दिवसाला साधारण २६० बस मार्गस्थ होतात. मात्र मंगळवारी सायंकाळपर्यत केवळ ४६ बस आगारातून सुटल्या होत्या. तर, ५१ फेऱ्या रद्द झाल्या होत्या. खास करून बीड, लातूर, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, सटाणा, नंदुरबार या भागात जाणाऱ्या बस रद्द झाल्या आहेत.स्वारगेट आगारातील सेवेला ३० ते ३५ टक्के फटका बसल्याचे दिसून आले. वल्लभनगर एसटी आगारातून दररोज ६५ बस सुटतात. मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत २२ पैकी केवळ सातच बस सुटल्या होत्या. या आगारात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथून ३२७, तर मुंबईहून १८३ अशा एकूण ५१० बस ये-जा करतात. दुपारी १२ वाजेपर्यंत ५१० पैकी २२५ एसटी बसची ये-जा झाली होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फायदा घेत खासगी वाहनचालकांनी दुप्पट भाडेवाढ केली आहे. एसटी बंद असल्याने झालेल्या अडचणीचा गैरफायदा घेत प्रवाशांची अक्षरश: लूट सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
What's Your Reaction?






