चार्जिंग केंद्राअभावी महापालिकेच्या ई-बस धूळखात

वसई – वसई-विरार महानगरपालिकेने वाहतूक आणि हरित पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलत कोट्यवधी रुपये खर्चून ४० ई-बस खरेदी केल्या आहेत. मात्र, या बस वापरात आणण्यासाठी आवश्यक त्या पूर्वतयारीच्या अभावामुळे सध्या त्यापैकी अनेक बस चार्जिंगसाठी जागेअभावी धूळखात उभ्या राहिल्या आहेत.
महानगरपालिकेकडे सध्या मुख्यालयाच्या मागील बाजूस एकमेव ई-बस चार्जिंग केंद्र आहे. त्यामुळे केवळ काही मोजक्या बसच चार्ज करून रस्त्यावर धावू शकतात. सध्या ४० बस असून त्यातील केवळ निम्म्या बसच मार्गावर धावताना दिसत आहेत. उर्वरित बस चार्जिंगच्या प्रतीक्षेत उभ्या आहेत, ज्यामुळे त्या वापरात येऊ शकत नाहीत.
परिणामी, वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतुकीची गरज पूर्ण करण्यात पालिकेच्या सेवा कमी पडत आहेत. नागरिकांना बसच्या फेऱ्या कमी असल्याने मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
यापूर्वीही अशाच पद्धतीने रस्ते स्वच्छता यंत्रणा खरेदी करून वापराअभावी ती अनेक महिने धूळखात पडून असल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे ई-बस सेवेसोबतही असाच प्रकार घडत असल्याचे चित्र नागरिकांमध्ये नाराजीचे कारण ठरत आहे.
पालिकेने या समस्येवर उपाय म्हणून सातीवली, नालासोपारा आणि नवघर येथे नव्या चार्जिंग केंद्रांची उभारणी करण्याचे नियोजन केले आहे. नालासोपारा आणि नवघर येथे महावितरणच्या सहकार्याने विद्युत काम सुरू करण्यात आले असून, यासाठी सुमारे १४ कोटी ७ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
या केंद्रांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर ई-बस सेवेचे कार्यक्षमता निश्चितच वाढेल आणि हरित पर्यावरणास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, यासाठी आवश्यक असलेल्या पूर्व नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
नागरिकांची मागणी स्पष्ट – आधी नियोजन, मगच खरेदी!
"महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून अत्याधुनिक सुविधा घेतल्या, पण त्यांचा उपयोगच होत नसेल तर तो पैसा वाया जातो. त्यामुळे अशा खरेदीपूर्वी योग्य नियोजन आणि पूरक सुविधा पूर्ण कराव्यात," अशी मागणी आता नागरिक जोरदारपणे करत आहेत.
What's Your Reaction?






