विरार:विरार येथे जीवदानी देवी संस्थेतर्फे आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ दांपत्यांचा विवाह पार पडला आहे.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गोरगरीब लोकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
गोरगरीब कुटुंबे आपल्या मुला-मुलींच्या विवाहासाठी कर्ज काढतात आणि पुढे त्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या जातात. ही समस्या लक्षात घेता, श्री जीवदानी संस्थानतर्फे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत डहाणू, बोईसर, तलासरी, विक्रमगड, जव्हार या तालुक्यांतील आदिवासी बांधवांसाठी आणि एप्रिल-मे महिन्यांत वसई, पालघर, वाडा, भिवंडी, शहापूर, मुरबाड या भागांतील गरजू लोकांसाठी हा विनामूल्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो.
यावर्षी २१ एप्रिल रोजी हा सोहळा पार पडला. यात २५ वधू वरांनी सहभाग घेतला होता. त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात विवाह सोहळा पार पडला.
या मंगल प्रसंगी माजी महापौर राजीव पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर, उपाध्यक्ष पंकज ठाकूर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशिनाथ पाटील, तसेच जीवदानी मंदिर ट्रस्टचे सदस्य, माजी नगरसेवक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वर्षीच्या सोहळ्यात वधू-वरांना जीवदानी देवी संस्थेच्या वतीने मणी मंगळसूत्र, वर-वधूसाठी पारंपरिक पेहराव, संसारोपयोगी साहित्य – ताट-वाटी, तांब्या, ग्लास, स्टील हंडा, कळशी, परात, मसाला डब्बा, टिफिन डब्बा, कुकर, थर्मास, बेडशीट, ब्लँकेट, चटई – भेटवस्तू स्वरूपात देण्यात आल्या. श्री जीवदानी देवी संस्थानच्या या उपक्रमातून गरजूंना केवळ मदतच नव्हे, तर सन्मानाने जगण्याची नवी दिशाही मिळाली आहे.

Previous
Article