दिवाळीच्या आतषबाजीमुळे वसई-विरारच्या हवेतील गुणवत्तेत बदल

विरार : दिवाळीतील आतषबाजीमुळे वसई-विरारच्या हवेत बदल झाला असून यामुळे हवेची गुणवत्ता काहीशी खालावली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी केलेल्या नोंदीत वसई-नवघरचा हवा गुणवत्ता निर्देशांक 146 इतका नोंदवला गेला आहे. हा निर्देशांक मध्यम स्वरूपाचा असला तरी या हवेमुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो तसेच दम्याच्या रुग्णांना त्रास होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विरार-बोळिंज येथील हवा गुणवत्ता निर्देशांक 194 इतका नोंदवण्यात आला आहे. सध्याच्या काळात फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जात असल्यामुळे वायु प्रदुषणही मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर आलं आहे, मात्र जास्त काळ वाईट श्रेणीतील वातावरणात राहिल्यास नागरिकांना श्वास घेताना त्रासाला सामोरे जावं लागू शकतं.
वसई- विरारचा भाग निसर्ग संपन्नतेसाठी ओळखला जातो. वसई-विरारच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात बागायती असल्याने शहरातील हवेची गुणवत्ता चांगली राहण्यास मदत होते. मात्र मागील काही वर्षांत वसई-विरारच्या शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढलेला आहे. बांधकामे करताना आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याने हवेत धुलीकणांचे प्रमाण वाढलेले आहे. शहरात तासनतास होणारी वाहतूक कोंडीही हवा बाधित करत आहे. याशिवाय गोखिवरे येथील क्षेपणभूमीतून निघणारी दुर्गंधी व धूर वसईतील हवेच्या गुणवत्तेत बदल होत आहे. त्यात दिवाळीतील आतषबाजीनेही या प्रदूषणात भर घातली आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी वसई-विरारमधील हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची नोंदवली गेली आहे.
What's Your Reaction?






