मिरा-भायंदर:नायगाव येथील वर्सावे खाडी पुलावरून एका दांपत्याने उडी मारल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत पतीला वाचवण्यात यश आले आहे, तर पत्नीचा शोध अद्याप सुरू आहे.

ससिकला दिनेश यादव (वय २८) आणि दिनेश यादव (वय ३२) हे जोडपे नायगावचे रहिवासी असून, ते गुरुवारी सकाळी अहमदाबादकडून मुंबईकडे येणाऱ्या पुलावर पोहोचले. अचानक ससिकलाने वर्सावे खाडीमध्ये उडी घेतली, आणि तिचा पती दिनेश यादव तिला वाचवण्यासाठी तात्काळ पाण्यात उडी घेतली.

घटनेची माहिती मिळताच मार्गावरील वाहनचालकांनी त्वरित स्थानिक पोलिसांना कळवले. मिरा-भायंदर अग्निशामक दल आणि काशिगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक विभागाने जलद बोटींच्या मदतीने दिनेश यादवला वाचवले, परंतु ससिकला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

काशिगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल पाटील यांनी सांगितले की, ससिकलाच्या शोधासाठी शोधकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेच्या मागे स्थानिक वाद असल्याचा संशय आहे, आणि पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे. पोलिस अधिक तपास करून घटनेच्या मूळ कारणांचा शोध घेत आहेत.