बदलापूरमध्ये चकमकीत नराधम अक्षय शिंदे ठार; पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ गोळ्या झाडल्या

बदलापूरमध्ये चकमकीत नराधम अक्षय शिंदे ठार; पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ गोळ्या झाडल्या

मुंबई : ठाणे जिल्ह्यामधील बदलापूर इथल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे आज, सोमवारी पोलिस चकमकीत ठार झालाय. अक्षयला संध्याकाळी ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसाची बंदूक हिसावली. यावेळी पोलिसांनी आत्मसरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय जखमी झाला. त्याला कळवा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. दरम्यान यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला असून त्याला ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलेय. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी संध्याकाळी पोलिस व्हॅनमधून ट्रान्झिट रिमांडसाठी नेण्यात येत होते. त्यावेळी त्याच्यासोबत पोलीस व्हॅनमध्ये शेजारी पोलिस बसला होता. त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना अक्षयने पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी देखील आत्मसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. त्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अक्षय याने बदलापूरच्या शाळेतील दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याची पोलिसांकडे नुकतीच कबुली दिली होती. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीदरम्यान शिंदेने त्याचा जबाब कॅमेऱ्यासमोर नोंदविला असून हा व्हिडीओ कोर्टात सादर करण्यात आला होता. बदलापुरातील शाळेत दोन चिमुकलींवरील झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात एसआयटीने दोन स्वतंत्र आरोपपत्र न्यायालयात सादर केली होती. दोन्ही विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली. डॉक्टर आणि पोलिसांसमोर या कबुलीजबाबाचे चित्रीकरणही झाले होते. दरम्यान या चकमकीवरून आरोपी अक्षयचे कुटुंबिय आणि विरोधी पक्षांनी आरोप केले आहेत. तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चकमकीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow