वसई, नालासोपारा व बोईसरमध्ये शिवसेनेचा एकमुखी दावा; संभाव्य उमेदवारांची चर्चासत्र

वसई, नालासोपारा व बोईसरमध्ये शिवसेनेचा एकमुखी दावा; संभाव्य उमेदवारांची चर्चासत्र
वसई, नालासोपारा व बोईसरमध्ये शिवसेनेचा एकमुखी दावा; संभाव्य उमेदवारांची चर्चासत्र

विरार : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसई, नालासोपारा व बोईसर या तीन मतदारसंघांवर शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दावा केला आहे. पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, 2 सप्टेंबर रोजी दुपारी वसई-गोखिवरे येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा निवडणूकपूर्व आढावा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनी पालघर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांची माहिती घेतली. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी वसई, नालासोपारा व बोईसर हे तीनही मतदारसंघ महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेने लढवावेत, अशी आग्रही मागणी केली. या उत्स्फूर्त मागणीवर संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना सर्वशक्तीनिशीने लढेल. त्यासाठी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवले जातील. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सत्ता कायम ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. पालघर जिल्ह्यातील सर्व जागा लढविण्यासंदर्भात पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली जाईल, असे ठाम आश्वासन या वेळी रवींद्र फाटक यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने वसई, नालासोपारा व बोईसर या तीनही जागा बहुजन विकास आघाडीविरोधात लढवल्या होत्या. या निवडणुकीत शिवसेनेच्या वसईतील उमेदवाराने 76 हजार इतके मताधिक्क्य मिळवले होते. नालासोपारातूनही 1 लाख 6 हजार इतके मताधिक्क्य शिवसेनेला मिळाले होते. तर बोईसरची जागा अवघ्या अडीच हजार मतांमुळे शिवसेनेला हरावी लागली होती. विशेष म्हणजे; शिवसेनेसोबत युतीत असलेल्या भाजपने त्या वेळी बहुजन विकास आघाडीला पडद्यामागून मदत केलेली होती. अन्यथा; या तीनही जागी शिवसेना विजयी होऊ शकली असती. याशिवाय पालघर लोकसभेवरही शिवसेनेचा नेहमीच दावा राहिला आहे. पण या वेळी ही जागा शिवसेनेने भाजपकरता सोडलेली आहे. त्या बदल्यात आता शिवसेनेने वसई, नालासोपारा व बोईसर हे तीन मतदारसंघ लढवावेत, अशी शिवसेना कार्यकर्त्यांची एकमुखी आग्रही मागणी आहे. मागील 30 वर्षांच्या बहुजन विकास आघाडीच्या राजकीय जाचातून वसई-विरारकरांना परिवर्तन हवे आहे. त्यासाठी शिवसेनेने या तीनही जागा प्राणपणाने लढवाव्यात. किंबहुना जिंकण्याच्या ईर्षेनेच लढाव्यात, असा शिवसेना कार्यकर्त्यांचा हट्ट आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत अवघ्या 15 दिवसांपूर्वी वसई आणि नालासोपारा मतदारसंघातील उमेदवारांची उमेदवारी जाहीर झालेली होती. या पार्श्वभूमीवर या वेळी मात्र शिवसेनेकडे संभाव्य उमेदवारांची चाचपणी आणि निवड करण्यासाठी पुरेसा अवधी आहे.

यांची नावे संभाव्य उमेदवारांच्या यादीत!

दरम्यान;शिवसेनेकडून आगरी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कैलास पाटील, स्वराज अभियानचे धनंजय गावडे, शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर आणि शिवसेना पालघर जिल्हा समन्वयक नवीन दुबे हे संभाव्य उमेदवार असतील, असे सांगितले जात आहे. कैलास पाटील यांचे स्थानिक आगरी-कोळी आणि अन्य समाजांत असलेले महत्त्व लक्षात घेता त्यांची उमेदवारीसाठी निवड केली जाऊ शकते. तर स्वराज अभियानचे धनंजय गावडे हे नेहमीच बहुजन विकास आघाडीविरोधातील प्रमुख आणि निर्भिड चेहरा म्हणून चर्चेत राहिलेले आहेत. मागील काही वर्षे ते आमदारकीसाठीचे संभाव्य दावेदार आहेत. त्यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही त्यांचे जवळचे संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत एकनाथ शिंदे त्यांचा कसा उपयोग करून घेतात, याकडे वसई-विरारकरांचे लक्ष आहे. शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर हेही या वेळी उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांचेही विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आत्यंतिक जवळचे संबंध आहेत. शिवाय रवींद्र फाटक यांचेही ते निकटवर्ती आहेत. शिवसेनेचा अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. आनंद दिघे व एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी शिवसेनेकरता काम केलेले असल्याने त्यांना या वेळी उमेदवारी मिळू शकते. विशेष म्हणजे; 2019 च्या निवडणुकीतही उमेदवारीसाठी त्यांचे नाव पुढे आलेले होते. तर नवीन दुबे हे माजी आमदार विवेक पंडित यांचे जावई आहेत. राज्यातील व वसईतील राजकारणात विवेक पंडित यांचे असलेले महत्त्व आणि ताकद नवीन दुबे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या कामी येऊ शकते. शिवाय मराठी व उत्तरभारतीय असा दुहेरी प्रभाव येथील जनतेवर ते पाडू शकत असल्याने त्यांचेही नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत असल्याचे सांगितले जात आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow