मिरा भाईंदर- वसई विरार आयुक्तालयातील पोलिसांनी केले टपाली मतदान

भाईंदर: विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्षात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी यांची टपाली मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ४२३ पोलिसांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
विधानसभा निवडणूक सुरक्षित वातावरणात आणि शांततेत पार पाडावी यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात विविध मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी गुंतले आहेत.
या कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गुरुवार पासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
वसई विरार व मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात २ जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. कार्यरत असलेल्या १४५ पोलिसांच्या टपाली मतदानासाठी मिरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रात प्रमोद महाजन सभागृहात व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ५ विशेष बूथची सुविधा केली आहे.
१४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान पोलीसांची टपाली मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी ६०९ पोलिसांनी १२ (ड ) अर्ज मतदानासाठी सादर केले होते.
पहिल्याच दिवशी आयुक्तालयाच्या क्षेत्रातील २७८ पोलीस कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. २० नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने शांततेत मतदान पार पडावे यासाठी पोलीस आयुक्तालयातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे असे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले आहे.
What's Your Reaction?






