ऑनलाइन गेमच्या जाळ्यात १४ वर्षांची मुलगी; बनारस येथून पोलिसांनी केली सुटका

मुंबई: लहान मुलांसाठी ऑनलाइन गेम किती धोकादायक ठरू शकतो, याचा धक्कादायक प्रकार गोरेगाव (मुंबई) येथे घडला आहे. १४ वर्षांची शाळकरी मुलगी एका प्रसिद्ध ऑनलाइन गेमच्या माध्यमातून फसवून अपहरण केली गेली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत वनराई पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून मुलीचा बनारस (उत्तर प्रदेश) येथून यशस्वी बचाव केला.
ही मुलगी गोरेगावमधील एका नामांकित शाळेत इयत्ता ९वीत शिकत असून तिचे आई-वडील कामासाठी घराबाहेर जातात, त्यामुळे ती घरी एकटी असायची. तिला मोबाइलमध्ये ऑनलाइन गेम खेळण्याची सवय होती. "फायर गेम" नावाचा एक गेम सध्या किशोरवयीन मुलांमध्ये लोकप्रिय असून ती तोच खेळत होती. सुमारे तीन महिन्यांपूर्वी या गेमच्या माध्यमातून तिची एका अनोळखी तरुणाशी ओळख झाली. पोलिसांनी सांगितले की, या तरुणाने हळूहळू तिच्यावर मानसिक नियंत्रण मिळवत तिला आपल्याच हुकमतीत वागवायला सुरुवात केली.
वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गेममध्ये समोरचा खेळाडू वेगवेगळी टास्क्स देत असतो, आणि पीडित मुलगी त्या सर्व टास्क्स पूर्ण करत होती. अशाच एका टास्कनुसार, तिला गोरेगावमधील एका निर्जन कचराभूमीत (डंपिंग ग्राउंड) जाण्यास सांगितले. तिने कोणालाही न सांगता तिथे एकटी गेली, जिथे आधीच काही अनोळखी व्यक्ती तिची वाट पाहत होत्या आणि त्यांनी तिचे अपहरण केले.
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पालकांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तिच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स (सीडीआर) तपासले, मात्र कोणतेही संशयास्पद नंबर सापडले नाहीत. मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली असता प्रेमसंबंधाचाही कोणताही संबंध दिसून आला नाही.
तपासादरम्यान पोलिसांना "फायर गेम" विषयी माहिती मिळाली. या गेमच्या माध्यमातून तिला फसवले जात असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी या गेम डेव्हलपर्सशी संपर्क साधून तांत्रिक माहिती मिळवली. त्यावरून मुलगी उत्तरप्रदेशातील बनारस येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे पथक बनारसला पोहोचले आणि तिला एका ठिकाणी डांबून ठेवले असल्याचे आढळून आले. तिथून तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि मुंबईला परत आणण्यात आले.
या अपहरण प्रकरणामागे १८ वर्षीय एक तरुण असल्याचा संशय असून, त्याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या मुलगी मानसिक धक्क्यात आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला की नाही, हे वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होईल, असे पोलीस निरीक्षक माने यांनी सांगितले.
"मुलगी अत्यंत मानसिक तणावात असून, अपहरण कशा प्रकारे झाले आणि यामागे आणखी कोण सहभागी आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे," असे माने म्हणाले.
या घटनेमुळे पालकांनी ऑनलाइन गेम आणि मुलांच्या इंटरनेट वापरावर अधिक सजग राहण्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
What's Your Reaction?






