४१ अनधिकृत इमारतींच्या जमिनीवर सांडपाणी प्रकल्प रखडला; जागामालकांचा टिडीआरला नकार, भूमाफियांचे अतिक्रमण कायम

नालासोपारा :नालासोपारा पूर्वेतील अग्रवाल नगरी परिसरात उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रकल्पावर नवीन पेच निर्माण झाला आहे. प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या भूखंडांवर पूर्वी उभारलेल्या ४१ अनधिकृत इमारतींच्या जागेवर आता सांडपाणी आणि कचराभूमी प्रकल्प उभारायचा आहे. मात्र संबंधित जागामालकांनी महानगरपालिकेच्या टिडीआर (विकास हस्तांतरण शुल्क) योजनेला नकार दिला आहे. टिडीआरऐवजी बाजारभावानुसार भरपाई द्या किंवा बदल्यात अन्य जमीन द्या, अशी त्यांनी ठाम मागणी केली आहे.
या सगळ्या प्रक्रियेला अजून एक अडथळा ठरत आहे – भूमाफियांचे अतिक्रमण. ४१ इमारतींवर कारवाई करून त्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत, मात्र काही भूभागांवरील अतिक्रमण अद्यापही कायम आहे. रिमा सिंग आणि रायसाहेब जैस्वाल यांचे अतिक्रमण खास उल्लेखनीय असून, पालिकेच्या संगनमताने हे अतिक्रमण झाले असल्याचा आरोप याचिकाकर्ता अजय शर्मा यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पालिका आयुक्तांविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे.
२००६ साली माजी नगरसेवक सीताराम गुप्ता व अरुण गुप्ता यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड बळकावले आणि २०१०-२०१२ दरम्यान ४१ अनधिकृत इमारती बांधल्या. त्याविरोधात अजय शर्मा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतर नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान महापालिकेने सर्व इमारतींवर कारवाई केली.
सध्या या ३० एकर भूखंडावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कचराभूमी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. भूखंडांचे मूळ मालक – अजय शर्मा, रमणलाल पटेल, मोहनलाल पटेल, धीरजलाल पटेल आणि रामदास पटेल – यांनी मात्र टिडीआरऐवजी रोख बाजारभाव किंवा समकक्ष जमीन मिळावी, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
यामुळे एकीकडे प्रकल्पाची अंमलबजावणी रखडली असून, दुसरीकडे भूमाफियांच्या अतिक्रमणामुळे कायद्याच्या अंमलबजावणीसही अडथळा निर्माण झाला आहे. या परिस्थितीत प्रकल्पाच्या प्रत्यक्ष सुरूवातीस विलंब होण्याची शक्यता आहे.
What's Your Reaction?






