सातीवलीत नाल्याचे सांडपाणी रस्त्यावर; नागरिकांच्या आरोग्यावर धोका

वसई : वसई पूर्वेतील सातीवली मौर्या नाका परिसरात नाला तुंबल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागले असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात राहणं आणि ये-जा करणं नागरिकांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहे.
सातीवली हा भाग कामगार वस्ती आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखला जातो. या भागात अनेक कारखाने, घरे व दुकाने असून, येथे नागरिकांची व वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र मौर्या नाका परिसरातील नाल्याच्या वाहतुकीत अडथळा आल्याने सांडपाणी रस्त्यावर आले आहे. पावसाळ्यापूर्वीच अशी स्थिती निर्माण झाल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहनांच्या चाकांमधून घाण पाणी उडत असून, नागरिकांच्या अंगावर थेट जात असल्याच्या तक्रारी आहेत.
या संदर्भात युवासेना (ठाकरे गट) चे वसीम खान यांनी पालिकेकडे तातडीने हस्तक्षेप करून नाला नियमितपणे स्वच्छ करण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, "पालिकेचे संबंधित विभाग फक्त तात्पुरते उपाय करतात. पण नाल्याचे तुंबणे ही नेहमीची समस्या बनली आहे. याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे."
सध्या तरी संबंधित विभागाकडून पाहणी करून उपाययोजना केल्या जातील, असे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीवर नागरिकांचा विश्वास उरलाच नाही. यामुळे लवकरच उपाय न केल्यास जनतेचा रोष वाढण्याची शक्यता आहे.
आपल्या भागातही अशीच कोणती समस्या जाणवत आहे का?
What's Your Reaction?






