वसई-विरारमध्ये ‘टीओडी’ स्मार्ट मीटर बसविण्याला वेग – आतापर्यंत ६४,६३६ मीटर बसवले

वसई-विरारमध्ये ‘टीओडी’ स्मार्ट मीटर बसविण्याला वेग – आतापर्यंत ६४,६३६ मीटर बसवले

वसई :महावितरणने वसई-विरार परिसरात वीज चोरी आळा घालण्यासाठी आणि अचूक बिलिंग प्रणालीसाठी अत्याधुनिक टाइम ऑफ डे (टीओडी) स्मार्ट मीटर बसविण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत ६४,६३६ स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.

सुरुवातीला महावितरण, महापारेषण कार्यालये, शासकीय संस्था, मोबाईल टॉवर आणि उच्च वापर असलेल्या ठिकाणी हे मीटर बसवले जात आहेत. यामध्ये ४७,१६४ जुने मीटर काढून त्यांच्या जागी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत, तर १७,४७२ नवीन वीज ग्राहकांना थेट स्मार्ट मीटर देण्यात आले आहेत.

वसई विभागांतर्गत सुमारे १०.५ लाख वीज ग्राहक असून यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि शासकीय ग्राहकांचा समावेश आहे. दरवर्षी वीज चोरीच्या अनेक घटना समोर येतात, ज्यामुळे महावितरणला १० ते १२ कोटी रुपयांचे नुकसान होते. मीटरमध्ये फेरफार, आकडे टाकणे, टॅपिंग किंवा रिमोट कंट्रोलद्वारे वीज चोरीच्या घटना विशेषतः दाट लोकवस्तीच्या भागात आढळतात.

ही समस्या रोखण्यासाठी महावितरणने टीओडी स्मार्ट मीटर बसवण्यावर भर दिला आहे. हे मीटर प्रीपेड नसून, ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच मासिक वीज देयक प्राप्त होईल. मात्र, या मीटरमधून वीज वापराची तासागणिक माहिती ग्राहक आणि महावितरण दोघांनाही मिळणार आहे.

या मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून ते महावितरणच्या सर्व्हरशी जोडलेले असते. त्यामुळे रीअल टाइम डेटा महावितरणकडे पोहोचतो आणि मीटर बिघडल्यास तत्काळ माहिती मिळते. ऑटोमॅटिक मीटर रीडिंगमुळे अचूक व वेळेवर देयक दिले जाते आणि ग्राहकांद्वारे फेरफार शक्य नाही.

विशेष म्हणजे, हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी कोणताही आर्थिक भार ग्राहकांवर पडणार नाही, कारण संपूर्ण खर्च सरकारच्या निधीतून करण्यात येत आहे.

वसई-विरारमध्ये नागरीकरण वेगाने वाढत असून दर महिन्याला ५,००० ते ६,००० नवीन वीज जोडणीसाठी अर्ज येत आहेत. त्यामुळे यापुढे सर्व नवीन वीज जोडण्यांना स्मार्ट मीटरच देण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow