मिरा-भाईंदर क्रीडा विभागासाठी नवीन धोरण तयार; तरण तलावात मुलाच्या मृत्यूनंतर शासनाचा निर्णायक पाऊल

मिरा-भाईंदर:मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या क्रीडा विभागासाठी नवीन सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. क्रीडा संकुलातील तरण तलावात नऊ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
महानगरपालिकेने नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून मैदानं, उद्याने, क्रीडा संकुले, तरण तलाव, फुटबॉल व क्रिकेट टर्फ अशा सुविधा विकसित केल्या आहेत. या सुविधांचा वापर करताना गैरवर्तन व हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.
नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, शासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने नव्या धोरणाची रूपरेषा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हे धोरण क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांच्या मदतीने तयार करण्यात आले असून लवकरच त्याला शासकीय मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
नवीन धोरणात क्रीडा संकुले, टर्फ व इतर सुविधा चालवताना सुरक्षितता, देखभाल आणि जबाबदारी यांवर विशेष भर देण्यात आला आहे. कंत्राटदारांच्या निष्क्रियतेमुळे अनेक दुर्घटना घडत असल्याचे आढळून आल्याने, पालिका अधिकाऱ्यांनाच आता जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
महसूल थेट पालिकेकडे
शासनाच्या निधीतून मिरा-भाईंदरमध्ये नव्याने तयार झालेल्या क्रिकेट आणि फुटबॉल टर्फच्या व्यवस्थापनासाठी ठाणे महापालिकेच्या धोरणाचा आधार घेतला जाणार आहे. या टर्फच्या माध्यमातून होणारा महसूल थेट पालिका तिजोरीत जमा केला जाईल, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी सांगितले की, "नवीन धोरणामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेला अग्रक्रम देण्यात आला असून, त्याचबरोबर क्रीडा सुविधांचा योग्य प्रकारे लाभ नागरिकांना मिळावा यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे."
What's Your Reaction?






