वसई-विरार, २४ एप्रिल : वसई-विरार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांचे संरचनात्मक लेखापरीक्षण सध्या सुरू असून, आतापर्यंत प्राप्त झालेल्या ९० शाळांच्या अहवालांतून धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये ११ शाळा अतिधोकादायक स्थितीत असून वापरास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय ७६ शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची गरज असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पालिकेचे उपायुक्त (शिक्षण) डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले की, पावसाळ्यात कोणताही अपघात होऊ नये, यासाठी पालिकेने कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे संरचनात्मक लेखापरीक्षण सुरू केले आहे. एकूण ११६ शाळांपैकी ९० शाळांचे अहवाल प्राप्त झाले असून, उर्वरित शाळांचे अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल.
वर्गवारीनुसार अहवालाचे निष्कर्ष :
-
C1 (अतिधोकादायक) – ११ शाळा
-
C2A आणि C2B (दुरुस्ती आवश्यक) – ७६ शाळा
-
C3 (किरकोळ दुरुस्ती आवश्यक) – ३ शाळा
पालिकेने या अहवालाच्या आधारे शिक्षण विभागाला वेळेत दुरुस्ती आणि नूतनीकरणाची सूचना दिली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ढिलाई केली जाणार नाही, असेही डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले.
चौकट
अतिधोकादायक स्थितीतील जिल्हा परिषद शाळा :
-
धानिव
-
पेल्हार हायवे
-
चंदनसार, विरार पूर्व
-
कसराळी
-
तळ्याचा पाडा
-
कामण उर्दू
-
मनवेलपाडा, विरार
-
नाळे गाव
-
नेहरू हिंदी विद्यालय, विरार पश्चिम
-
पाटीचा पाडा
-
सोपारा उर्दू शाळा
शाळा हस्तांतरणासाठी सुरू आहेत प्रयत्न
महापालिका स्थापन झाल्यानंतर वसई-विरार शहरात पालिकेने एकही शाळा उभारलेली नाही. नागरिकांकडून शाळा उभारणीची सातत्याने मागणी होत आहे, मात्र जागेच्या अडचणी, शिक्षण मंडळाच्या अडथळ्यांमुळे हे काम रखडले आहे. सध्या पालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांचे हस्तांतरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नुकत्याच अधिवेशनात वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनीही शाळा हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत मंत्रालयात बैठकही झाली आहे, तरीही हस्तांतरणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
Previous
Article