नायगाव पोलिसांचे कौतुकास्पद कार्य: १५ दिवसांत आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तीन महिलांचे प्राण वाचवले

नायगाव पोलिसांचे कौतुकास्पद कार्य: १५ दिवसांत आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तीन महिलांचे प्राण वाचवले

वसई: मागील पंधरा दिवसांत नायगाव पोलिसांनी आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तीन महिलांचे प्राण वाचवून कौतुकास्पद कार्य केले आहे. या घटनांमध्ये पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून महिलांचे प्राण वाचवले. ११२ नियंत्रण कक्षाच्या तातडीच्या प्रतिसादामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे हे शक्य झाले.

पहिली घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडली. नायगावच्या परेरानगर येथील रेड रोज इमारतीमध्ये राहणारी १६ वर्षीय मुलगी पंख्याच्या सिलिंगला दुपट्टा बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. ११२ हेल्पलाइनवर माहिती मिळताच पोलीस शिपाई संतोष घुगे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. घराचा दरवाजा तोडून त्यांनी मुलीला आत्महत्येपासून थांबवले आणि समुपदेशन करून तिच्या प्राणांची रक्षा केली. या मुलीने घरगुती वादामुळे हे पाऊल उचलले होते.

दुसरी घटना १ सप्टेंबर रोजी घडली होती. नक्षत्र प्राइड इमारतीत राहणाऱ्या एका दांपत्यामध्ये जोराचे भांडण सुरू होते. ११२ हेल्पलाइनवर महिलेच्या भावाने उत्तर प्रदेश येथून पोलिसांना कॉल करून मदतीची विनंती केली. संतोष घुगे यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. १३व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३७ वर्षीय महिलेला घुगे यांनी चातुर्याने पकडून तिला वाचवले.

तिसरी घटना १३ सप्टेंबर रोजी घडली. जूचंद्र येथील म्हात्रेवाडी चाळीत २४ वर्षीय विवाहित महिलेने कौटुंबिक वादातून गळफास लावण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे पाहिले. तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी तिला रुग्णालयात दाखल केल्यामुळे तिचे प्राण वाचले. तीन दिवस उपचारानंतर महिलेची प्रकृती स्थिर झाली.

या तीन घटनांमध्ये नायगाव पोलिसांच्या तात्काळ आणि प्रभावी कार्यवाहीमुळे तीन महिलांचे प्राण वाचले आहेत. या घटनांनी पोलिसांच्या तत्परतेचे आणि सामाजिक जबाबदारीचे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow