नालासोपारा - वसई-विरार पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामावर पालिकेकडून तोडक कारवाई करण्यात येत आहे.  नालासोपाऱ्यातील प्रभाग समिती 'जी' वालीव अंतर्गत असलेल्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची करावी करण्यात आली. पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार व अपर आयुक्त (दक्षिण) संजय हेरवाडे यांच्या आदेशानुसार तसेच उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

प्रभाग समिती 'जी' वालिव अंतर्गत गाव मौजे देवदल सर्व्हे नंबर १३ येथे १० गाळे व अंदाजे २ हजार चौरस फूट औद्यीगिक गाळा इतके बांधकाम निष्कासित करण्यात आले. गाव मौजे कामण रोड येथे अंदाजे ३ हजार चौरस फूट औद्योगिक गाळा बांधकाम निष्कासित करण्यात आले. 

जूचंद्र सर्व्हे नंबर २६३ परेरा नगर येथे अडीच हजार चौरस फूट पत्रा शेड, दगडी पायाचे बांधकाम निष्कासित केले गेले, या मोहिमेत एकूण ७ हजार ५०० चौरस फुटाचे पत्रा आणि विटांच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. 

सदर मोहिमेत प्रभाग समिती 'जी'चे कनिष्ठ अभियंता कौस्तुभ तामोरे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त दीपक सावंत, वरिष्ठ लिपिक विजय नगडे तसेच इतर मजूर आणि पालिकेचे कर्मचारी सहभागी होते.